Published On : Sun, Sep 3rd, 2017

वाल्मिकी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: वाल्मिकी समाजाला विविध क्षेत्रात पुढे नेण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशिल असून वाल्मिकी समाजासमोरचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जवाहर विद्यार्थीगृह येथे वाल्मिकी फाऊंडेशनतर्फे वाल्मिकी समाज चतुर्थ युवक-युवती परिचय व पारिवारिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. उमेशनाथजी महाराज, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार डॉ. परिणय फुके, श्री. रामु पवार, श्री. गिरीश पांडव, सौ. रुपाताई राय, नगरसेवक विजय चुटेले, संजय नाहर, अध्यक्ष सतिश डागोर, फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाल्मिकी फाऊंडेशनच्या अहवाल पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाल्मिकी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला युवक युवती परिचय मेळावा स्तुत्य उपक्रम असून याद्वारे युवकांना आपले व्यक्तित्व समाजासमोर मांडण्याची संधी मिळते. वाल्मिकी समाजातही शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याने नव्या पिढीतील युवक युवतींमध्ये आत्मविश्वास दिसून येत आहे. काळानुरुप विवाह समारंभावरील होणारा मोठा खर्च टाळण्याची आवश्यकता असून हा खर्च शिक्षणासाठी वापरल्यास ते अधिक योग्य ठरेल, असेही श्री. फडणवीस यांनी नमुद केले.

श्री. उमेशनाथजी महाराज म्हणाले, स्वच्छतेविषयक जनजागृतीत वाल्मिकी समाज नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. समाजातील युवक-युवती उच्च शिक्षण घेवून एअर होस्टेस, डॉक्टर, तसेच प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवित आहेत ही बाब नक्कीच प्रशंसनिय आहेत. मुलांवर संस्कार करणे आणि त्यांना शिक्षित करणे यामध्ये पालकांनी कोणतीही तडजोड करु नये, असे आवाहनही श्री. उमेशनाथजी महाराज यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, श्री. गिरीश पांडव तसेच मान्यवरांची भाषणे झाली. युवक-युवती परिचय मेळाव्यात एअर होस्टेस, डॉक्टर, प्रशासकीय सेवा, तसेच अन्य विविध क्षेत्रातील कार्यरत युवक युवतींनी अत्यंत आत्मविश्वासाने आपला व आपल्या कार्यक्षेत्राचा परिचय दिला.