Published On : Mon, Jan 1st, 2024

राम मंदिराच्या नावावर भक्तांची फसवणूक, क्यूआर कोड शेअर करून ऑनलाईन लूट ; विहिंपचा आरोप

Advertisement

नागपूर : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रणं पाठवली जात आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानकही सज्ज आहेत. रामभक्तांना अयोध्येत येण्याकरता कोणतीही अडचण येऊ नये याकरता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी केली जात आहे. मात्र याच घडामोडीदरम्यान एका धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर क्यूआर कोड शेअर करून राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत.या क्यूआरसोबतच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्हीही योगदान द्या, असा संदेश दिला जात असल्याची तक्रार र विश्व हिंदू परिषदेने केली.

विशेष म्हणजे अयोध्या येथील राम मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान होणाऱ्या रामलल्लाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार योगीराज यांनी घडवली आहे. रामलल्ला कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती निळय़ा दगडापासून घडवली आहे. तीन शिल्पकारांनी तीन प्रकारच्या दगडांमधून तीन मूर्ती घडवल्या होत्या. यातून या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.