मुंबई: गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून एका विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यात चांदणी साहिल शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शाळेत अधिक माहितीसाठी दाखल झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मुलांना उलट्यांचा त्रास होत असल्याने प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं. ही सर्व मुलं एकाच शाळेतील असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या मुलांना विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. शाळेतून देण्यात आलेल्या पालिकेच्या औषधांमुळे ही विषबाधा झाली असावी हे स्पष्ट सांगता येत नाही. मात्र आज सकाळी 9.30 वाजल्यापासून शाळेतील मुलांना रुग्णालयात आणलं जातं आहे. आतापर्यंत 50 ते 60 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. एका मुलाला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.” या मुलांना पोटात मळमळ होत होती आणि उलट्या होत होत्या. राजावाडी रुग्णालयात या मुलांना अॅन्टीबायोटीक्स देण्यात येत आहे. अजूनही रुग्णालयात मुलांना दाखल केलं जातंय. या मुलांना नक्की कशातून विषबाधा झाली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.