Published On : Mon, Jun 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

बिहारहून आलेली मुकबधिर मुले नागपुरात हरवली; वाठोडा पोलिसांच्या यशस्वी शोधमोहीमेनंतर सापडली!

Advertisement

नागपूर – शहरातील वाठोडा हद्दीत शनिवारी सायंकाळी एक काळजाला भिडवणारी घटना घडली. बिहार येथून नातेवाइकांकडे आलेली दोघं लहान, मुकबधिर बालकंएक ६ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी, आराधना नगर, बिडगाव परिसरातील घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाली. मात्र नागपूर पोलिसांची तत्परता आणि स्थानिक नागरिकांचा जागरूक सहभाग यामुळे तब्बल पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर ही दोन्ही मुले सुखरूप सापडली.

हरवलेली मुले बोलू शकत नसल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुलं दिसेनाशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम तातडीने सुरू करण्यात आली.

संपूर्ण परिसरात व्हॉट्सअ‍ॅप गटांद्वारे मुलांचे फोटो आणि वर्णन प्रसारित करण्यात आले. तसेच पीए सिस्टमद्वारे परिसरात सतत अनाउन्समेंट करून लोकांना अलर्ट करण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे पुलाखाली पाण्याजवळ ही मुले खेळताना दिसल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी तपास करत असताना लहान पायांचे ठसेही आढळून आले. पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाल्याने तात्काळ H.D.R.F. पथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिक गुडू शेवणे यांनी धाडस दाखवत स्वतः पाण्यात उतरून तपास केला, पण मुले तिथे आढळली नाहीत.

Advertisement

रात्री २.३० च्या सुमारास छात्रपूर फार्मच्या दिशेने मुले जाताना दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी उमिया परिसरात शोध घेतला. अखेर रेल्वे लाईनवर २ ते ३ किलोमीटर अंतरावर ही दोन्ही मुले चालताना आढळली. परिसर अपरिचित असल्याने ते रस्ता चुकले होते.मुलं सापडताच त्यांच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी जल्लोष केला.

या शोधमोहीमेसाठी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, सह आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त शिवाजी राठोड आणि प्रभारी उपायुक्त माकनिकर यांनीही मार्गदर्शन केले.

या शोधमोहीमेत सहभाग –
सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, वपोनी हरीश बोराडे, पोउनि माधव गुंडेकर, अमोल पाटील, अतुल पवार, कृष्णा साळुंखे, कैलास चकोले, सुनिल वानखेडे, जितेंद्र मनगटे, प्रफुल वाघमारे, मनोहर बागायतगर, महेंद्र लाडे, विशाल चहांदे, रामु चितरमारे, तसेच बीट मार्शल व पारडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि तपास पथक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

स्थानिकांचा सहभाग –
बिडगाव परिसरातील सचिन ढोमणे, प्रज्वल वासनिक, संतोष रॉय, दिनेश कातुरे, कैलास टाले, सतिश बर्डे, महेश केशरवाणी यांचा शोधमोहीमेत मोलाचा वाटा होता. गुडू शेवणे यांचे धाडस विशेष उल्लेखनीय ठरले. तसेच लोकप्रतिनिधी अशिष मल्लेवार व अवंतीकाताई लेमुरवाळे यांनीही पोलिसांना सहकार्य केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.