मुंबई : मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान घडलेल्या अपघातामुळे उत्सवावर शोककळा पसरली आहे. उंचावरून पडल्याने एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृताचे नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) असे आहे.
शनिवारी सकाळी दहीहंडीची उत्साहात तयारी सुरू होती. बाल गोविंदा पथकातील जगमोहन चौधरी हे हंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेली दोरी बांधत होते. मात्र, उंचावर काम करताना त्यांचा तोल सुटला आणि ते थेट खाली कोसळले. डोक्यावर व शरीरावर गंभीर मार बसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना घडताच वातावरणातील आनंदाचे रूपांतर क्षणात दुःखात झाले. स्थानिक नागरिक व पथकातील सदस्यांनी चौधरी यांच्या अचानक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. दहीहंडीच्या खेळात ते नेहमी उत्साहाने भाग घेत असल्याने त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरवर्षी दहीहंडी सोहळ्यादरम्यान अपघातांची मालिका घडत असून, अनेक गोविंदे जखमी किंवा मृत्युमुखी पडतात. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना केली जात असली तरीही धोका कायम असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
या अपघाताबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.