नागपूर : डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातून चोरीला गेलेल्या अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेची पोलिसांनी काही तासांत सुखरूप सुटका केली. तहसील आणि यशोधरानगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बालिकेला यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरातून शोधून काढण्यात आले. बालिकेला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गोळीबार चौक परिसरातील रहिवासी प्रभा शक्ती पाठराबे यांनी २० ऑगस्ट रोजी बालिकेला जन्म दिला होता. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालिका तिची आजी मीना खळतकर यांच्याजवळ होती. त्यावेळी बुरखा परिधान केलेली एक महिला तेथे आली. बालिकेला लसीकरणासाठी घेऊन जात असल्याचे सांगत तिने कुटुंबीयांची दिशाभूल केली. तसेच सरकारी योजनेअंतर्गत अर्ज केल्यास पैसे आणि साहित्य मिळेल, असे आमिषही दाखवले.
महिला बालिकेला घेऊन गेल्यानंतर बराच वेळ परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली. मात्र, रुग्णालयात अशा प्रकारचे कोणतेही लसीकरण सुरू नसल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने तहसील पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासून संशयित महिलेचा माग काढला. तपासादरम्यान तिचा ठावठिकाणा यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरात लागला. संयुक्त पोलिस पथकाने तेथे कारवाई करून आशियाना अंजुम सैयद अल्ताफ हिला ताब्यात घेतले. तिचा भाऊ मोहम्मद शोएब यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेत तिच्या आईकडे सोपवले. दरम्यान, संशयित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित महिलेच्या मुलीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर नवजात बालिकेला रुग्णालयातून घेऊन जाण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





