नागपूर : ऑनलाइन ई-कॉमर्समध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका तरुणाला ८ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा गंडा घातला. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर नफा देऊन तरुणाचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत मोठी रक्कम गुंतवून घेत आरोपीने संपर्क तोडला. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुलवन, गरोबा मैदान, वर्धमाननगर येथील देवेश किशोर बागडे यांना मोबाईलवर एक लिंक पाठवण्यात आली होती. ही लिंक ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असल्याचे सांगत त्यावर पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून देवेश यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. त्यावर नफाही मिळाल्याने त्यांचा विश्वास अधिकच वाढला.
यानंतर आरोपीने वेगवेगळ्या तारखांना मोठ्या रकमा गुंतवण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे देवेश यांनी एकूण ८ लाख ४२ हजार ६०० रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली. उलट आरोपीने आणखी १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवेश यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्नॅपचॅटवर ‘रिया अग्रवाल’ या नावाने खाते चालवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




