
नागपूर: पाचपावली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या बेकायदेशीर डांबून ठेवणे व बलात्कार प्रकरणाला तपासादरम्यान महत्त्वाचे वळण मिळाले आहे. २९ वर्षीय पीडितेने आरोपी, त्याचे वडील आणि एका महिलेसह तिघांवर केलेले गंभीर आरोप प्राथमिक वैद्यकीय व तांत्रिक पुराव्यांशी जुळत नसल्याचे तपासात समोर आले आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने आपल्या वडिलांच्या उपस्थितीत तिच्यावर बलात्कार केला असून, एका महिलेने या कृत्यात मदत केल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांमुळे प्रकरणाने मोठे लक्ष वेधले होते.
तक्रारीत पीडितेने सांगितले होते की, २०२१ मध्ये चंद्रपूर येथे शिक्षण घेत असताना एका कपड्यांच्या दुकानातील चेंजिंग रूममध्ये गुप्त कॅमेरा लावून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत करण्यात आला. नंतर हा व्हिडिओ वापरून लैंगिक शोषण व पैशांची मागणी करत ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. या प्रकरणी चंद्रपूरमध्ये यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीला अटक होऊन नंतर जामिनावर सोडण्यात आले होते. सततच्या त्रासामुळे आपल्याला नागपूरला स्थलांतर करावे लागल्याचा दावाही पीडितेने केला आहे.
नवीन तक्रारीनुसार, १० जानेवारी रोजी आरोपी, त्याचे वडील आणि एक महिला नागपूरमधील तिच्या घरी आले आणि तिला जबरदस्तीने डांबून ठेवून बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला.
मात्र तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईल लोकेशनसह तांत्रिक तपासणीतून संबंधित दिवशी मुख्य आरोपी नागपूरमध्ये उपस्थित नसल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराचे कोणतेही स्पष्ट पुरावे आढळून आलेले नाहीत.
तपासादरम्यान पीडितेने यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी केल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. “सध्या तक्रारीतील अनेक आरोप वैद्यकीय आणि तांत्रिक पुराव्यांशी जुळत नाहीत. मात्र तपास सुरू आहे,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कठोर कायद्यांचा गैरवापर करून निष्पाप व्यक्तींना गोवण्याचे प्रकार गंभीर असून, त्यामुळे खऱ्या पीडितांच्या प्रकरणांवर परिणाम होतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कायद्याचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अंतिम निर्णय तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून असेल, असे पोलिसांनी सांगितले.








