
नागपूर : गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नंदनवन परिसरात धडक कारवाई करून सट्टा-पट्टीवर जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १८ आरोपींना ताब्यात घेत सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घडलेला प्रकार असा की, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की एन.आय.टी. गार्डन, दर्शन कॉलनी, नंदनवन येथे काही व्यक्ती सट्टा-पट्टीवर जुगार खेळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तातडीने छापा टाकला असता तेथे अक्षय प्रकाश शेंडे (३४, रा. सद्भावना नगर) आणि जावेद शेख हकीम शेख (४०, रा. सद्भावना नगर) यांच्यासह इतर १६ जण पैशांची बाजी लावून सट्टा-पट्टीवर जुगार खेळताना आढळले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोकड ३२,५९० रुपये, ११ मोबाईल फोन, ३ दुचाकी वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख ४२ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने व त्यांच्या पथकाने केली.









