नागपूर : शहरातील बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने हॉटेल हेरिटेज येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकत ४५ जणांना ताब्यात घेतले.
माननीय पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान ३६ पुरुष आणि ९ महिलांसह एकूण ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून १३ हुक्का पॉट्ससह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात COTPA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी ड्रग टेस्टिंग किटच्या साहाय्याने नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शहरात बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि अमली पदार्थांशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा गुन्हे शाखेने दिला आहे.




