Published On : Mon, Jul 9th, 2018

क्रिकेट सट्टयाची वसुली करणारा पीएसआय गजाआड, दोन बुकींनाही अटक


नागपूर – पिस्तुलासह नागपुरात येऊन एका बुकीकडून क्रिकेट सट्टयाची थकित रोकड वसूल करू पाहणा-या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. ज्याच्यासोबत तो वसुलीसाठी नागपुरात आला त्या चंद्रपूरातील दोन क्रिकेट बुकींनाही पोलिसांनी अटक केली. दिलीप लोखंडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे तर रितिक मेश्राम आणि रोहित गुल्हाणे अशी अटक झालेल्या बुकींची नावे आहेत.

मेश्राम आणि गुल्हाणे चंद्रपुरात क्रिकेट सट्टयाची खायवाडी करतात. खामल्यातील कन्हैया करमचंदानी याच्याकडे त्यांची आयपीएलच्या सट्टयाची १ लाख, २० हजारांची उधारी होती. ती देण्यासाठी करमचंदानी टाळाटाळ करीत असल्याने यापूर्वीही मेश्राम आणि गुल्हाणे नागपुरात आले होते. त्यांनी करमचंदानीला रक्कम मागितली असता त्याने त्यावेळी दोन आठवड्यांची मुदत मागितली होती.

मात्र, ही मुदत संपूनही तो रक्कम देत नसल्याचे पाहून मेश्राम आणि गुल्हाणे या दोघांनी त्यांचा मित्र चंद्रपूर पोलीस दलातील उपनिरीक्षक दिलीप लोखंडे याला हाताशी धरले. त्याला उधारिची रक्कम वसूल करून देण्यासाठी पर्सेंटटेजही पक्के करण्यात आले. त्यानुसार, भाड्याची कार करून आरोपी मेश्राम आणि गुल्हाणे आणि पीएसआय लोखंडे रविवारी भल्या सकाळी नागपुरात आले. ते सरळ करमचंदानीच्या खामल्यातील घरी धडकले. काही अंतरावर लोखंडे चालकासह कारमध्ये थांबला. तर, मेश्राम आणि गुल्हाणे करमचंदानीच्या घरी गेले.

त्यांनी आपली थकित रक्कम करमचंदानीला मागितली. एवढ्या सकाळी रक्कम देऊ शकत नाही, काही दिवस थांबावे लागेल, असे करमचंदानी म्हणाला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. यावेळी मेश्राम आणि गुल्हाणे यांनी त्याला भाईसे मिलले म्हणून कारजवळ आणले. आतमध्ये बसलेल्या पीएसआय लोखंडेने त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. तातडीने रक्कम देण्याची व्यवस्था कर, असेही बजावले. त्यावेळी करमचंदानीने दोन तासांची मुदत मागून आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

असे अडकवले बुकींना

दुपार, सायंकाळ झाली तरी करमचंदानी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आरोपींनी त्याला फोन करून धमकावले. शिवीगाळ करून उचलून नेण्याचीही धमकी दिली. त्यामुळे करमचंदानी याने आपल्या सहका-यांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात तकार नोंदवली. ठाणेदार राजेंद्र पाठक यांनी लगेच आरोपींना पकडण्यासाठी धावपळ सुरू केली.

एपीआय सचिन शिर्के त्यांच्या सहका-यांसह सापळा रचला. करमचंदानीने फोन करून आरोपींना प्रतापनगरात बोलविले आणि ते येताच पोलिसांनी त्यांना पकडले. लोखंडे याने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला तसेच मेश्राम आणि गुल्हाणे या तिघांना अटक केली. ते दारूच्या नशेत टून्न होते, हे विशेष!