ज्या रस्त्यांवर पाणी तुंबेल त्या रस्त्याचा विभाग जबाबदार -ना. गडकरींनी घेतली आढावा बैठक
-मनपा लोककर्म विभागाच्या कामावर नाराजी-नाल्यातील भूखंडाला नासुप्रने दिले आरएल
-पाणी तुंबणार नाही याची 15 दिवसात व्यवस्था करा
नागपूर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर व अन्य वस्त्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना झालेल्या प्रचंड त्रासाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधकाम करणार्या सर्व शासकीय संस्थांना आपापल्या रस्त्यांची देखभाल करून तुंबलेले पाणी हटविण्याची जबाबदारी मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची असून त्यांनी ती जबाबदारी पार पाडायला हवी होती. तसेच मनपाने चांगली नवीन ड्रेनेज सिस्टिमचा प्रस्ताव तयार करा. त्यासाठी लागणार्या निधीची व्यवस्था करू पण शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या असे स्पष्ट निर्देश ना. गडकरी यांनी आज चारही विभागांना दिले.
या बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त बी राधाकृष्णन, एनडीआरएफचे रमेशकुमार, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णाजी खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. बावनकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक दाभोळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सरदेशमुख, मनपाच्या लोककर्म विभागाच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त करताना ना. गडकरी यांनी सांगितले की, पावसाळा आला तरी अपूर्ण कामे पूर्ण केली जात नाहीत.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकांना त्रास होत आहे. प्रकल्पांच्या कामासाठी पैसे आहेत. पण कामे पूर्ण केली जात नाहीत. अनेक रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले दिसून आले. रस्त्यांची पहिल्या टप्प्याची कामे 2011 ला सुरु झाली. आज 2022 हे वर्ष सुरु आहे. पण कामे पूर्ण झाली नाही, या वस्तुस्थितीकडे आ. प्रवीण दटके यांनी ना. गडकरींचे लक्ष वेधले.
‘ड्रेनेज सिस्टिम’ जुनी आहे आणि यावेळी पाऊस अधिक झाला, असे तोकडे कारण प्रशासनाने या बैठकीत दिले. शहरातील काही रस्ते मनपाचे, काही राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे, काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तर काही नासुप्रचे आहेत. ज्या विभागाच्या मालकीचे रस्ते आहेत, त्या विभागाची पाटी रस्त्यांवर लावण्यात यावी. तसेच कंत्राटदाराचे नाव व नंबरही त्यावर देण्यात यावा अशी सूचना आ. दटके यांनी केली. ते ना. गडकरी यांनी मान्य केली. येत्या 15 दिवसात रस्त्यांवर पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. गडकरींनी या बैठकीत दिले.
नासुप्रच्या कळमना भागातील लेआऊटमध्ये रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये पाणीच पाणी आहे. तसेच शहरातील एक चेंबर चांगले नाही. चेंबरवर झाकणेही नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून ना. गडकरी म्हणाले- नवीन कामे थांबवा. जी अपूर्ण कामे आहेत ती पूर्ण करा आणि पावसामुळे चिखल होणार्या भागातील दुरुस्ती त्वरित करा. ज्या विभागाच्या रस्त्यावर पाणी साचले त्यासाठी कुणाची जबाबदारी आहे, ते येत्या दोन दिवसात कळवा. नाल्यात असलेल्या भूखंडालाही नासुप्रने आरएल दिल्याकडेही ना. गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले.
लोखंडीपूल, घाटरोड, अजनी पूल या रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीतही खोळंबा झाला होता. नरेंद्रनगर पुलाखाली पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद होती. लोकांना अन्य मार्गांनी जावे लागले, या तक्रारींनंतर ना. गडकरी यांनी ज्या रस्त्यांवर पाणी साचले होते, त्या भागाची तपासणी व निरीक्षक संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी करावी व पुढे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.