Published On : Wed, Jan 31st, 2018

४ फेब्रुवारीला ‘परीक्षा Crack करा’ निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळा

Advertisement
  • प्रा. राजा आकाश सांगणार परीक्षा पूर्वनियोजनाचे तंत्र
  • स्वयम्, माय करिअर क्लब व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन

नागपूर: दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा वळणमार्ग आहे. या परीक्षांतील निकालाच्या आधारावर त्यांच्या करिअरची दिशा ठरत असते. गेल्या काही वर्षांपासून कमी गुण मिळाल्याने अथवा नापास झाल्यामुळे नैराश्य आलेले अनेक विद्यार्थी आत्मघाती निर्णय घेत आहेत. दहावी/बारावीच्या निकालानंतर नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे दरवर्षी वाढणारे प्रमाण पालकांसाठी चिंताजनक आहे. परीक्षा कोणतीही असो, विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण असतेच. अपेक्षित निकालाकरिता पालक व विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. मानसिक भीती दूर करून परीक्षेत उत्तम कामगिरी कशी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वयम् सामाजिक संस्था, माय करिअर क्लब आणि कमला नेहरू महाविद्यालयाच्या वतीने रविवार, ४ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘परीक्षा क्रॅक करा’ ही निःशुल्क कार्यशाळा आयोजित केली आहे. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यशाळेत प्रसिद्ध कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट प्रा. राजा आकाश हे मार्गदर्शन करतील.

राज्यात २१ फेब्रुवारीपासून बारावी, तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. याशिवाय ५ मार्चपासून सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. तसेच मार्च-एप्रिलमध्ये विद्यापीठाच्या व त्यानंतर एमपीएससीच्या विविध पूर्वपरीक्षा घेण्यात येतात. प्रत्येक विद्यार्थ्यांवर या काळात उत्तम कामगिरी करून दाखवण्याचा दबाव येतो. या चिंतेवर कशी मात करायची, परीक्षेची भीती दूर कशी करायची, वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, एकाग्रता कशी वाढवायची, विद्यार्थ्यांचा आहार-विहार कसा असावा आणि परीक्षाकाळात पालकांची भूमिका काय असावी आदी विषयांवर प्रा. राजा आकाश पालक-विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. पहिल्या सत्रात ते परीक्षा पूर्वनियोजनाच्या टिप्स देतील, तर दुसऱ्या सत्रात विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. नावनोंदणीसाठी ७७२००५०२४५/९०४९७६३८४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्या वतीने आतापर्यंत विदर्भातील २५० वर शाळा-कॉलेजेसमध्ये निःशुल्क करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. याशिवाय नागपुरातही पालकनीती, स्पर्धा परीक्षा आणि मोटिव्हेशनल सेमिनार घेण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांची गरज लक्षात घेऊन माय करिअर क्लबतर्फे मार्गदर्शनपर निःशुल्क कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या :

जानेवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हेविषयक सांख्यिकी अहवालानुसार देशात आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी साडेतेरा टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आत्महत्या करणारे बहुतेक विद्यार्थी हे १४ वर्षांपुढील आहेत. या अहवालामधून राज्यातील विद्यार्थी परीक्षेतील अपयश, महाविद्यालयीन स्पर्धेचा ताण आणि कौटुंंबिक अडचणी यांना सामोरे जाताना अधिक प्रमाणात मृत्यूला कवटाळत आहेत, ही बाब स्पष्ट झाली असून वर्षागणिक त्यात वाढ होत आहे. अनेक शाळा/महाविद्यालयांमध्ये कौन्सिलिंगची सुविधा नाही. विद्यार्थ्यांची आत्महत्या ही शाळा/महाविद्यालयांसाठीही चिंतेची बाब ठरली आहे.

शाळा/महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा :
महाविद्यालयांनी कौन्सिलर नेमावे, याबाबत शासनाने यापूर्वी सूचना दिली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही कौन्सिलरची सुविधा, विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष, विद्यार्थी आणि शिक्षकांची सामाईक समिती नेमण्याच्या सूचना महाविद्यालयांना केल्या जातात. मात्र, कौन्सिलर नेमणे हा सक्तीचा नियम नसल्यामुळे काही अपवाद वगळता महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

‘मिशन जीने दो’मध्ये सहभागी व्हा!
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि नैराश्याचे वाढलेले प्रमाण ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबने जनजागृतीसाठी ‘मिशन जीने दो’ ही मोहीम सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर ५ जून २०१७ रोजी संविधान चौक, नागपूर येथून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. दहावी/बारावीसह इतर परीक्षांच्या निकालाचा आनंदाने स्वीकार करून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षणाचे पर्याय उपलब्ध व्हावेत, याबाबत जागृतीसाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. ‘मिशन जीने दो’ या मोहिमेतील परीक्षापूर्व कार्यशाळा हा एक भाग असून, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन स्वयमचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे.