नवी दिल्ली : अखेर देशाच्या १५व्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, एनडीएचे उमेदवार आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी INDIA आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती.
मतमोजणीत राधाकृष्णन यांनी विरोधी उमेदवारावर मोठी आघाडी घेत विजयी कामगिरी केली. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मात्र यातील १५ मते अवैध ठरली. अंतिम आकडेवारीनुसार, एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना तब्बल ४५२ मते मिळाली. या निकालामुळे एनडीएच्या राजकीय ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले, तर INDIA आघाडीला मोठा धक्का बसला.
सामान्यतः लोकसभा व राज्यसभा मिळून ७८८ खासदार असतात. सध्या ७ जागा रिक्त असल्याने ७८१ खासदारांना मतदानाची संधी होती. मात्र १३ खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही.
मतदानापासून दूर राहणाऱ्यांमध्ये ४ खासदार बीआरएसचे, ७ खासदार बीजेडीचे, १ खासदार शिरोमणी अकाली दलाचे आणि १ अपक्ष खासदार यांचा समावेश होता. एनडीएच्या ४२७ खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने ठामपणे मतदान करत त्यांचा विजय निश्चित केला.
या निवडणुकीच्या निकालामुळे एनडीएच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, तर विरोधकांना आत्मपरीक्षण करावे लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.