फेसबुक लाईव्ह जनजागृतीचा समारोप : अखेरच्या दिवशी ‘नवी जीवनशैली’ विषयावर मार्गदर्शन
नागपूर : सप्टेंबर महिन्यात कोव्हिडचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न होते. अनेक शंका होत्या. नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनने पुढाकार घेऊन ‘कोव्हिड संवाद’ ह्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रारंभी शेकडोच्या संख्येने येणारे प्रश्न आता अत्यंत कमी झाले. याचाच अर्थ कोव्हिड संवाद हा कार्यक्रम नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि शंकाचे समाधान करण्यात यशस्वी ठरला. असे कार्यक्रम गरजेनुसार भविष्यातही घेत राहू, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.
मनपा आणि आयएमएच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा समारोप करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, नागरिकांच्या मनात कोव्हिडविषयी असलेली भीती शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन देऊन घालविणे अत्यावश्यक होते. याच गरजेतून कोव्हिड संवाद कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. ९ सप्टेंबरला सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे आतापर्यंत ३० भाग झालेत. सुमारे ६६ तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला.
होम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी, आहार इथपासून ते कोव्हिडनंतर बदलेली नवी जीवनशैली या विषयापर्यंत नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. केवळ मनपाच्या फेसबुक पेजवरून सुमारे ३५ लाख लोकांनी तर इतर पेजवरून एकूण ५० लाख लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम अत्यंत उपयोगी असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात असे उपक्रम नियमित राबवित राहू आणि नागरिकांसोबत तयार झालेले संवादाचे नाते यापुढेही कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
समारोपीय मार्गदर्शनात आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, छातीरोग तज्ज्ञ तथा फुप्फुस तज्ज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार, भूल तज्ज्ञ डॉ. सुनिता लवांगे, सेनगुप्ता हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. शंतनु सेनगुप्ता यांची उपस्थिती होती. त्यांनी कोव्हिड नंतर नागरिकांनी आत्मसात करावयाची नवी सामान्य जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले. सध्या उत्सवाचे दिवस आहेत. जेव्हा-जेव्हा उत्सव आले तेव्हा तेव्हा नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली. आता गेल्या काही दिवसांपासून संख्या नियंत्रणात असली तरी ‘ऑल वेल’ झाले आहे, आपण आता बिनधास्त फिरू शकतो, ही भावना डोक्यातून काढायला हवी. कोरोनावर आजही लस उपलब्ध नाही.
त्यामुळे काळजी आणि नियमांचे पालन हाच यावर नियंत्रणासाठी एकमेव उपाय आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून नियम पाळा, कोरोनावर नियंत्रण दूर नाही, असा सल्ला उपस्थित डॉक्टरांनी दिला. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री अंमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. मास्क हा आता आपला सर्वात चांगला मित्र आहे. त्यामुळे तो वापरा. मात्र वापरताना तो योग्यप्रकारे वापरा. मास्क रस्त्यावर कुठेही फेकू नका. कारण त्यामुळे संक्रमण होऊ शकते. लहान-लहान गोष्टी आहेत. त्या पाळा. हीच जीवनशैली आता भविष्यात आत्मसात करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत कोव्हिड संवाद कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व डॉक्टर्स, आय.एम.ए.चे सर्व सदस्य आणि नागरिकांचे महापौर संदीप जोशी यांनी आभार मानले.