Published On : Mon, Nov 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय;सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला 

Advertisement

नागपूर : अधिवक्ता एकनाथ धर्माजी निमगडे यांच्या खळबळजनक हत्येच्या तपासात आज न्यायालयाने महत्वाची नोंद करत केंद्रीय अन्वेषण ब्युरोचा (CBI) क्लोजर रिपोर्ट सरळ फेटाळून लावला आहे. तक्रारदार अनूपम निमगडे यांच्या तक्रारीवरून 2016 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात आता दोन आरोपींविरुद्ध थेट प्रक्रिया चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१२ व्या संयुक्त नागरी न्यायाधीश आणि ज्येष्ठ दंडाधिकारी (JMFC), नागपूर यांनी हा आदेश दिला आहे.

न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश- 

  • CBI द्वारे दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट नामंजूर.
  • मोसिन बदरुद्दीन अन्सारी @ राजा पॉप (सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये) आणि
    रंजीत हलपे सफळेकर (रा. लक्ष्मी टॉवर, जुना पोलीस स्टेशनजवळ, कामठी)
    या दोघांविरुद्ध IPC 302 सह 34 तसेच शस्त्र कायदा कलम 3/25, 27 अन्वये गुन्हा नोंदवून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश.
  • आरोपींना 25 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स.
  • राजा पॉप याच्या हजर राहण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट जारी.
  • CBI ला कलम 207 नुसार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती उपलब्ध करण्याचे निर्देश.

प्रकरणाचा पार्श्वभूमी- 

6 सप्टेंबर 2016 रोजी वरिष्ठ वकील एकनाथ धर्माजी निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा प्रकारच्या दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिस तपासानंतर प्रकरण CBI कडे सोपविण्यात आले होते; परंतु CBI ने “पुरावे अपुरे” असल्याचे सांगत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पीडित कुटुंबाने हा अहवाल आव्हान दिल्यानंतर आज न्यायालयाने तो निकालात काढत पुन्हा आरोपींवर प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.

पीडित कुटुंबाची प्रतिक्रिया- 

अनूपम निमगडे यांनी आपली भावना व्यक्त केली.
वडिलांच्या हत्येच्या तपासात न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले. CBI चा रिपोर्ट फेटाळल्याने न्याय मिळण्याची नवीन आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान हा निर्णय निमगडे हत्याकांडाच्या तपासाला नव्या दिशेने नेणारा ठरला असून, पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement