मुंबई : भारतीय युवकांमधील ऊर्जा, शिस्त आणि मेहनतीमुळे देश प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पोस्ट रिपब्लिक कॅम्प एनसीसी कॅडेटसच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर २६ जानेवारीला दिल्ली येथे राजपथावर संचलनात भाग घेण्याची तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या येथील दोन युवक आणि एका युवतीने दि बेस्ट कॅडेट म्हणून कामगिरी बजावली.
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जगातील ब्रिटन, अमेरिका, इग्लंड, चीन, जपान अशा अनेक राष्ट्रांतील युवकांचे सरासरी वय ३५ वर्षांच्या पुढे आहे. जगात भारत हा एकमेव देश असा आहे, येथील युवकांचे सरासरी वय २५ वर्ष आहे. हीच मोठी ताकद या देशाची आहे. आज आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहोत. साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आहे. जगभरात होत असलेल्या विविध जागतिक परिषदांमध्ये पूर्वी चीनची चर्चा व्हायची, आता आपण चीनला मागे टाकले आहे. अलिकडेच डाओसच्या जागतिक आर्थिक परिषदेत त्याचा प्रत्यय आला. सर्व ठिकाणी तेथे भारत देशाची आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच चर्चा होती. पुढील काळात भारतीय तरुणांची जिद्द आणि मेहनत यामुळे जागतिक नकाशावर भारताची कामगिरी, प्रगती उंचावलेली दिसेल.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पूजा निकम, गुरजित सिंग, सर्वेश नावंदे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. तावडे यांनीही एनसीसीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातून १११ एनसीसी कॅडेट गेले होते. तेथे त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि संचालनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे पूजा निकम या विद्यार्थीनीला राजपथावर संचालनात महिलांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.