Published On : Fri, Jul 23rd, 2021

मनपाच्या इंग्रजी माध्यम शाळा गरीब, गरजू परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ठरणार संजीवनी : महापौर दयाशंकर तिवारी

स्व.गोपालराव मोटघरे मनपा शाळेत इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशाला सुरूवात

नागपूर, : नागपूर शहरातील झोपडपट्टी भागात राहणा-या मुलांना मनपाद्वारे नि:शुल्क दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतविताना येणारे अनेक अडथळे पार करण्यात आले. प्रतिभा असून केवळ परिस्थितीमुळे उत्तम शिक्षण घेउ न शकणा-या विद्यार्थ्यांसाठी मनपाद्वारे नि:शुल्क इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा मार्ग आज मोकळा झालेला आहे. गुरूपोर्णिमेच्या पर्वावर शाळेचा शुभारंभ होणे हे मनपासाठी भाग्य आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या शहरातील गरीब आणि गरजू परिवारातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहेत, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेद्वारे आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर शहरात सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशाचा शुभारंभ गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने केला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड.संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, नागपूर शहरातील मनपाच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करून त्यातून आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल, अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी मनपा गत तीन महिन्यांपासून प्रयत्नशील होती. त्यासंदर्भात गतवर्षी सभागृहाद्वारे मान्यता देण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मागील वर्षी या शाळा सुरू होउ शकल्या नाहीत. अखेर २०२१मध्ये या शाळा सुरू करण्यामध्ये मनपाला यश आले. या कार्यामध्ये शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांना गुरु पोर्णिमेच्या महत्व सांगतांना महापौरांनी सांगितले की, कोरोना महामारी काळात आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे माध्यम वर्गीय परिवारांचे पालकांसाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे अवघड जात होते. असे सर्व नागरिकांसाठी मनपाची शाळा धीर देण्याचे काम करेल. या शाळांचे संचालन करणा-या आकांक्षा फाउंडेशनला मनपाच्याही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संचालनाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.

स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळेमध्ये इंग्रजी माध्यम प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सात विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहे. विशेष म्हणजे, या शाळेमध्ये भारती विद्या मंदिर भवन्स येथील एका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. कोरोना या महामारीमुळे ओढवलेल्या संकटात सर्वसामान्य, गरीब पालकांच्या मुलांना नि:शुल्क दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. या शाळेमध्ये के.जी. वन, के.जी.टू आणि पहिल्या वर्गासाठी प्रवेश देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानंतरच शाळा सुरू होणार असल्या तरी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये असलेल्या निर्धारित सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे लवकरच प्रवेश फुल्ल होईल, असा विश्वासही महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी सांगितले की, सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया प्रारंभ केली जात आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाऊंडेशन संस्थेला देण्यात आली आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरोज पांडे उपस्थित होत्या.