Published On : Fri, Jun 19th, 2020

अवैध बांधकामाच्या विरोधात मनपाची मोठी कारवाई

Advertisement

धरमपेठ, नेहरूनगर, आसीनगर, मंगळवारी झोनमधील अतिक्रमण तोडले

नागपूर : गेल्या काही दिवसात महानगरपालिकेतर्फे अनधिकृतरित्या करण्यात आलेले बांधकाम हटविण्याची मोठी कारवाई मनपाच्या अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील धरमपेठ, नेहरूनगर, आसीनगर व मंगळवारी झोनच्या विविध भागात निदर्शनास आलेल्या अतिक्रमणाचा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार पथकाद्वारे सफाया करण्यात आला. कोरोनाचा प्रादूर्भाव यशस्वीपणे नियंत्रित करीत असतांना अतिक्रमणासारख्या महत्वाच्या विषयांकडे सुध्दा मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचे पूर्ण लक्ष आहे.

Advertisement

धरमपेठ झोन अंतर्गत क्रेझी कॅसल वॉटर अँड ॲम्युझमेंट पार्क बंद करण्यात आले. या पार्कच्या परिसरातून नाग नदी वाहते. सदर परिसरातून गेलेल्या नदीच्या पात्रावर पार्कच्या मालकाकडून दोन मोठ्या लोखंडी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. ही बाब निदर्शनास येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधिताला त्वरीत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिक्रमण विभागाद्वारे संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली. नोटीसची दखल घेत पार्कच्या मालकाकडून दोन्ही पूल हटविण्यात आले आहे, व उर्वरित छोटी बांधकामे हटविणे सुरु आहे.

नेहरूनगर झोन अंतर्गत दर्शन कॉलनी येथे नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर गोदाम, प्रसाधनगृह व स्टोअर रूमचे बांधकाम करण्यात आले होते. सदर प्रकार लक्षात येताच मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार त्वरीत संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले आहे. लवकरच नाल्यावरील अनधिकृत स्लॅबही तोडण्यात येईल.

मंगळवारी झोनमध्येही मोठे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदर येथील लिंक रोडवर तब्बल तीन हजार चौरस फुट जागेमध्ये अनधिकृतरित्या गॅरेज तयार करण्यात आले होते. यासंदर्भात तातडीने दखल घेत अतिक्रमण पथकाने कारवाई करीत संपूर्ण बांधकाम तोडले. जरीपटका येथील रहीवासी वापरासाठी असलेल्या जागेतील इलेक्ट्रॉनिक गॅजेस्ट चे मोठे गोडावुन सुध्दा आजचे कारवाई दरम्यान सील करण्यात आले. या झोन अंतर्गत एक मोठे ‍शिकस्त घर सुध्दा पाडण्यात आले.

पिवळी नदी पात्र व नारा घाटातील अतिक्रमण हटविले
आसीनगर झोन मधील विदर्भ डिस्टीलरीज या देशी दारू निर्मिती करणा-या कंपनीकडून मोठे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या संदर्भात सदर कंपनी मालकास बांधकाम काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीसवर कोणतिही कार्यवाही न करण्यात आल्याने मनपाच्या अतिक्रमण पथकाद्वारे संपूर्ण बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे व रु. 50,000 दंड आकारण्यात आला. याशिवाय आसीनगर झोन अंतर्गत पिवळी नदी पात्रात अनधिकृतरित्या १८ झोपड्यांचे बांधकाम करण्यात आले होते. या सर्व झोपड्या पथकाद्वारे हटविण्यात आल्या आहेत.

नारी घाटाच्या जागेमध्येही अतिक्रमण करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला. या घाटाच्या जागेमध्ये एका व्यावसायिकाद्वारे पाईप आणि केबल जमा करून कब्जा करण्यात आला होता. या व्यक्तिरिक्त नेहरु नगर झोन अंतर्गत दानिश लॉनचे मालकाने केलेले मोठे शेडचे अतिक्रमण सुध्दा काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सदर गंभीर प्रकार निदर्शनास येताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तात्काळ सर्व सामान मनपाच्या ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिक्रमण पथकाने कारवाई करीत संपूर्ण सामान ताब्यात घेत जागा मोकळी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement