Published On : Tue, Oct 12th, 2021

मनपाचे २३ दवाखाने एन.यू.एच.एम. मध्ये होणार समाविष्ट

Advertisement

आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांची मंजुरी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सोमवारी (ता. ११) मनपा अंतर्गत कार्यान्वित असलेले शहरातील २३ दवाखाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजना (एन.यू.एच.एम.) मध्ये समाविष्ठ करण्यास वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांनी मंजुरी दिली. सोमवारी (ता. ११) स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात यासंबंधी बैठक पार पडली.

यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी, सदस्या विद्या कन्हेरे, भावना लोणारे, सदस्य नागेश मानकर हे ऑनलाईन माध्यमातून बैठकीत जुळले होते. तर मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

यावेळी मनपा अंतर्गत असलेली दवाखाने एन.यू.एच.एम. मध्ये समाविष्ठ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मनपा अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजना सन २०१४-१५ पासून सुरु करण्यात आली. त्यावेळी १७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यू.पी.एच.सी.) कार्यान्वित असून २०२१ रोजी २९ यू.पी.एच.सी. कार्यान्वित आहेत. यात आणखी वाढ झाली असून २०२१-२२ साठी एकूण ५१ यू.पी.एच.सी. ला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी यावेळी दिली.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, मनपा अंतर्गत कार्यान्वित असलेल्या २३ दवाखान्यांपैकी १४ दवाखाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून रूपांतरित करावयाचे आहेत. या केंद्रासाठी ५१ मनुष्यबळाची मंजुरी मिळाली आहे. तसेच यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वेळ राहील आणि पूर्णवेळ एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच इंदिरा गांधी रुग्णालय आणि पाचपावली सूतिकागृह येथे मोफत नॉर्मल आणि सिझेरियन डिलिव्हरी करण्यात येत आहे. या रुग्णालयात २४ तास एक डॉक्टर उपलब्ध असेल. यामुळे आता येथील ओपीडीमध्ये दररोज ७० ते ८० रुग्णांची तपासणी केली जात आहे, असे डॉ. संजय चिलकर म्हणाले.

अनुपस्थित डॉक्टरांवर कारवाई करा : महेश महाजन
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे डॉक्टर आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाही किंवा नेहमी अनुपस्थित राहतात अशा डॉक्टरांवार कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांनी यावेळी दिले. तसेच मनपाच्या काही दवाखान्यात वेळेआधीच ओपीडी बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता निर्धारित वेळेचे योग्य पालन करण्याचेही निर्देशही यावेळी त्यांनी दिले.