Published On : Sat, Jan 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जलसंवर्धनाच्या दिशेने मनपा पुढेही अग्रेसित राहणार : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

संत कबीर शाळेमधील रेन वाटर हार्वेस्टिंग आणि आयओटी आधारित भूजल पुनर्भरण प्रणालीचे उद्घाटन

नागपूर : आज भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. महाराष्ट्रातील लातुरमध्ये नागपुरातून रेल्वेने पाणी पुरविण्यात आले होते. अशी भीषण स्थिती कुठेही निर्माण होउ शकते. ती होउ नये यासाठी आपण सर्व जण आजच सजग होउन पाण्याच्या नियोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागपूर महानगरपालिकेने घराघरातून निघणारे सांडपाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. यामुळे स्वच्छ पाण्याची बचत झाली. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प उभारण्याबाबत मनपा आता पुढे आली आहे. पूर्व नागपुरातून या प्रकल्पाची सुरूवात होत असून जलसंवर्धनाच्या दिशेने पुढेही मनपा अग्रेसित राहणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त माध्यमातून पूर्व नागपुरातील संत कबीर शाळेमध्ये साकारण्यात आलेल्या ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पाचे गुरूवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आयओटी आधारित भूजल पुनर्भरण या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला युरोपियन कमिशनचे अनुदान मिळाले असून आयसीएलईआय साउथ एशियाच्या सहकार्याने अर्बन लिड्स (URBAN LEDS II) अंतर्गत राबविण्यात आलेले आहे.

याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक राजकुमार साहु, दीपक वाडिभस्मे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, स्मार्ट सिटीच्या वित्त अधिकारी नेहा झा, मोबिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ.शील घुले, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, मुख्य नियोजक राहुल पांडे, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, संजय अवचट आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, आधीच्या काळात छोटे छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जायचे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजलपातळी वाढायची. आता सगळीकडे सिमेंटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे असे प्रकल्प यासाठी महत्वकांक्षी ठरतात. ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पाद्वारे केवळ पाणी जमिनीत जिरवले जाणार नसून आधी त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाईल व स्वच्छ पाणी जमिनीत जिरविण्यात येईल, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

आईनस्टाइन या वैज्ञानिकाने चवथे विश्वयुद्ध झाल्यास ते केवळ पाण्यासाठी होईल, असे वक्तव्य केले होते. अशी स्थिती उद्भवू नये यासाठी आपण सर्वांनी पाणी वाचविण्याची गरज आहे. यासोबतच पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. संत कबीरांनी नेहमी चांगले कर्म करण्याची शिकवण दिली. त्यांच्या नावाने असलेल्या शाळेतून या प्रकल्पाची सुरूवात होणे ही आनंददायी बाब असहे. सदर प्रकल्प पर्यावरणपूरक असून येणा-या पिढीला समर्पित आहे. मनुष्याच्या सर्व गरजांची पूर्ती करू शकेल हे सर्व निसर्गाकडे आहे. मात्र निसर्गाकडे असे काहीच नाही की ज्यामुळे मनुष्याच्या लालसेची पूर्ती होउ शकेल, असे गांधीजी म्हणाले होते. जोपर्यंत सृष्टी राहिल तोपर्यंत निसर्ग आपल्या गरजांची पूर्ती करत राहिल मात्र निसर्गाचे आपण शोषण सुरू केल्यास निसर्ग आपल्याला साथ देणार नाही. त्यामुळे निसर्गाच्या विपरीत काही घडू नये यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. पाणी ही सदासर्वकाळाची गरज आहे. त्याची बचत, जतन आणि संवर्धनासाठी मनपाचा पुढाकार महत्वकांक्षी आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाबद्दल मनपा व स्मार्ट सिटीचे अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या माध्यमाने या भागात भूजलची परिस्थिती उत्तम होण्यास मदत मिळेल. नागपूर शहराच्या बाहेरील भागामध्ये विकास कामे करण्यात अनेक अडचणी येतात. मात्र स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या भागातही उत्तम विकास झालेला आहे, असे सांगत त्यांनी स्मार्ट सिटीच्या कार्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले.

स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी आपल्या संदेशात सांगितले की, आयओटी चा वापर करून भूजल पातळी आणि पाण्याच्या गुणवत्तेचे रिमोट मॉनिटरींग हे वैशिष्ट्य प्रकल्पाचा एक अभिनव आणि अद्वितीय भाग आहे. संपूर्ण प्रणालीच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी वाटर क्वॉलिटी पॅरामीटर जसे की, पीएच, टीडीएस, इलेक्ट्रिकल कनडक्टिव्हीटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भूजल पातळी या सारख्या महत्वाच्या पॅरामीटर्सचे रिअल टाईममध्ये परीक्षण देखील केले जाणार आहे.

प्रारंभी स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली आणि नागरिकांना ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’चे महत्व पटवून दिले. स्मार्ट सिटीतर्फे शहरातील विविध भागात भूजलपातळी संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले व प्रायोगित तत्वावर संत कबीर आणि भारत नगर शाळेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. या माध्यमातून शहरातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. यातील पहिल्या शाळेमध्ये प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. शहरात सिमेंटचे रस्ते आणि इतर बाबींमुळे जमिनीत पाणी जिरविण्यात अडथळे येतात. त्यामुळे शहराच्या बाहेरील भागात असे प्रकल्प राबविल्यास त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होउ शकतो, या हेतूने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे वर्षाला सुमारे तीन लाख लीटर पाण्याची बचत होणार आहे. दोन्ही शाळा मिळून किमान आठ लाख लीटर पाण्याची बचत होउ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

इकलीचे सहायक व्यवस्थापक शार्दुल वेणेगुरकर यांनी प्रकल्पाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार शाळेच्या प्रभारी मानसी मुखर्जी यांनी मानले.

Advertisement
Advertisement