Published On : Sun, Apr 18th, 2021

मनपाच्या पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार : महापौर

Advertisement

११० खाटांचे कोव्हिड रुग्णालय लवकर जनतेच्या सेवेत

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाचपावली सुतिकागृह येथे कोव्हिड रुग्णांसाठी ११० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात भर्ती रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मनपा सहा किलोलिटरचा ऑक्सिजन प्लांट उभारत असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. अशा प्रकारची व्यवस्था असणारे हे नागपुरातील पहिले शासकीय रुग्णालय आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

महापौरांनी पाचपावली सूतिकागृह रुग्णालयाची रविवारी पाहणी केली. ते म्हणाले, ऑक्सिजनची व्यवस्था असलेले ७० बेड्सचे रुग्णालय सोमवार पासून जनतेच्या सेवेसाठी सुरु होईल. या रुग्णालयातील लसीकरण केंद्र स्थानांतरित करून बेड्सची संख्या ११० बेड्सपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी सध्या येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला बाळाभाऊ पेठ येथील मनपा शाळा च्या इमारतीमध्ये हलविण्यात येइल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाची चमू या कामात लागली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असून या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. लिक्विड ऑक्सिजनला गॅसमध्ये परिवर्तन करून रुग्णांना दिला जाईल. या रुग्णालयाची व्यस्था स्वयंसेवी संस्था अशरफी फाऊंडेशन यांना देण्यात आली आहे. डॉक्टर्स, फिजिशियनसुद्धा येथे राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या भेटीत महापौरांसोबत उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकार भिवगडे आणि रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.