Published On : Fri, Jul 30th, 2021

इंग्रजी माध्यमाचे उत्तम शिक्षण देण्यास मनपा कटिबध्द : महापौर

Advertisement

दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपुरातील मनपाच्या इंग्रजी माध्यम शाळेमधील प्रवेशाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सहापैकी चार शाळांमध्ये के.जी.वन आणि के.जी.टू करिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी (ता.२९) महापौर दयाशंकर तिवारी यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील स्व.बाबुराव बोबडे मनपा प्राथमिक शाळा, चिंचभवन वर्धा रोड आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील राणी दुर्गावती मनपा प्राथमिक शाळा येथील प्रवेशाचा शुभारंभ केला.

दक्षिण-पश्चिम नागपुरातील इंग्रजी माध्यम शाळा प्रवेशाच्या शुभारंभप्रसंगी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, शिक्षण समिती उपसभापती सुमेधा देशपांडे, समिती सदस्या संगिता गि-हे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर तर उत्तर नागपुरातील शाळा प्रवेश शुभारंभप्रसंगी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, समिती सदस्या संगीता गि-हे, शिक्षणाधिकारी यांच्यासह नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक मो.इब्राहिम तौफीक अहमद आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची उत्तम इमारत असतानाही या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होता. यामागे मुख्य कारण म्हणजे मराठी, हिंदी व उर्दू माध्यमासोबतच मनपाच्या इंग्रजी माध्यमातील शाळा नसणे. हे कारण पुढे येताच मनपाद्वारे उत्तर नागपूरमध्ये जी.एम.बनातवाला यांच्या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. इंग्रजी माध्यम सुरू करताच ३०० ते ३५० विद्यार्थीसंख्या असलेल्या या शाळेतील विद्यार्थी संख्या थेट १७०० पर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे, यावर्षी दहावीच्या निकालामध्ये मनपाच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याने सर्वाधिक ९५ टक्के गुण घेत अव्‍वल क्रमांक पटकाविला आहे. मनपाने केवळ शाळा सुरू न करता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले. त्याचेच फलीत आज मिळत आहे. शहरातील अन्य भागातही विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे. केवळ गरीबीमुळे कोणताही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मनपाद्वारे शहरात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सहाही शाळेमधील प्रवेशाचा शुभारंभ झालेला असून याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, असा विश्वासही महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकामध्ये शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संकल्पना विषद केली. नागपूर शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मनपाद्वारे राज्यातील इतर शहरातील मनपाद्वारे संचालित शाळांची पाहणी करण्यात आली. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि मुंबई येथे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आकांक्षा फाउंडेशन या संस्थेद्वारे दर्जेदार शिक्षण देण्यात असल्याचे निदर्शनास आले. या संस्थेलाच मनपाच्या या सहाही शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह पालकांचे समुपेदशनही या संस्थांमार्फत केले जाते. मनपाच्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळा शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना नव्या युगात धैर्याने सामोरे जाण्याचे बळ देणार आहे, असेही ते म्हणाले. आभार शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी मानले.