Published On : Sat, Apr 25th, 2020

कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात – डॉ. नितीन राऊत

Advertisement

जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे

बाधित रुग्णांच्या आरोग्य सुधारणा प्रमाणात वाढ

नागपूर: कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत देशात तसेच राज्यात सातत्याने वाढ होत असतानाच प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनामुळे तुलनेने प्रमाण नियंत्रणात आहे. सध्या ते 14 दिवसांवर आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत दिली. हे जिल्हा प्रशासनाचे यश आहे. सद्यसि्थतीत नागपुरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, अपर विभागीय आयुक्त अभिजित बांगर, मेडीकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.

आरोग्य सेवा सुविधा, कायदा व सुव्यवस्था, नागरी सुविधा, अन्नधान्य वाटप, कम्युनिटी किचन, उद्योगविषयक, अत्यावश्यक सेवांचा पालमकंत्र्यांनी तपशीलवार आढावा घेतला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केंद्र शासनाच्या 15 आणि 24 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील आस्थापना काही प्रमाणात सुरु करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंदे, आस्थापना सुरु करण्यासाठी संबंधित उद्योजकांनी केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन, त्यानुसार आराखडा तयार करावा. उद्योग सुरु करण्यापूर्वी सोशल डिस्टन्सिगचे काटेकोरपणे पालन करावे. कामगारांना वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे आणि मास्क वापरुनच आस्थापनांमध्ये प्रवेश द्यावा. महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून फक्त आस्थापनांचे मालक आणि मुख्य कार्य अधिकारी यांना स्वत:च्या जबाबदारी आणि सुरक्षेवरच ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. मात्र कामगारांना औद्योगिक वसाहतींमध्येच राहणे तथा जेवणाची व्यवस्था करणे कंपनी मालकास अनिवार्य असेल, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.

क्वारंटाईन सेंटर सुरु करताना विश्वासात घ्या
कोरोना बांधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केंद्रामध्ये 14 दिवस तपासणीसाठी ठेवण्यात येते. संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढत असल्याने नवीन क्वारंटाईन सेंटर सुरु करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधीला विश्वासात घ्यावे, अशी सूचना पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी या बैठकीत केली.

विभागातील कोरोनावर नियंत्रण मिळविताना प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी तपशीलवार माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मनपा आणि जिल्हा प्रशासन योग्य समन्वय ठेवून काम करत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाकडून सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि कोरोनामुळे बाधित भागात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी माहिती दिली. तर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोना विलगीकरण कक्षाभोवती असलेल्या पोलीस यंत्रणेबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.

मेडीकल आणि मेयोचे अधिष्ठातांनी कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी आरोग्य्‍ विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्यासाठी सदैव तत्पर आरोगय यंत्रणा, आरोग्य सुविधा, उपलब्ध बेड्स, व्हेंटीलेटर्स, अतिदक्षता विभागाची आरोग्य प्रशासनाची असलेली तयारी याबाबत माहिती दिली. रमजान महिना सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.