नागपूर : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून ठेवलं आहे (Corona Virus New Patients In Nagpur). आता कोरोनावरील लसही उपलब्ध झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अनेकांना लस देण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये बिफिकरी वाढली आहे. अनेकजण विना मास्क, कोरोना नियमांचं पालन करत नसल्याचं चित्र आहे. त्याचा विपरित परिणाम आता दिसायला लागला आहे. नागपूरमध्ये Covid-19 ची नव्यानं लाट (New Wave Of Corona) आल्याचं दिसत आहे (Corona Virus New Patients In Nagpur).
24 तासात कोरोनाचे 500 नवे रुग्ण
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. तर दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे.
66 दिवसानंतर आकड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ
नागपूर जिल्ह्यात तब्बल 66 दिवसानंतर पुन्हा 24 तासांत 500 नवे रुग्ण आढळले आहेत. चार दिवसांत तब्बल 1 हजार 398 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 37 हजार 498 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 लाख 4 हजार 522 जणांच्या तपासण्या झाल्या आहेत (Corona Virus New Patients In Nagpur).
तर गेल्या 24 तासात नागपुरात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनामुळे एकूण मृत्यूसंख्या ही 4 हजार 315 वर पोहोचली आहे. नागपुरात अनेक ठिकाणी मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेक लोक कोव्हिडचे नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे.
नागपुरात रुग्णसंख्या तातडीनं कमी झाली पाहिजे, दीपक म्हैसेकरांचे आदेश
मुख्यमंत्र्यांचे कोरोनाविषयक सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये उचस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. यावेळी म्हैसेकर यांनी नागपुरात रुग्णसंख्या तातडीनं कमी झाली पाहिजे असं सांगत चाचण्यांची संख्या वाढवण्यासह जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले.
