Published On : Sat, Feb 13th, 2021

अनेकांच्या संपर्कात येणा-या सर्व वर्गातील कर्मचा-यांची कोरोना चाचणी अनिवार्य

मनपाचा महत्वपूर्ण निर्णय : महापौरांच्या अध्यक्षतेत विशेष बैठक

नागपूर : नागपूर शहरातील काही भागात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या ही गंभीर बाब आहे. भविष्यात होणारा धोका लक्षात घेता व त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मनपाने महत्वपूर्ण पाउल उचलले आहे. शहरातील भाजी विक्रेते, डिलीव्हीरी बॉय, कुरिअर सेवेतील कर्मचारी, दुध विक्रेते, हॉकर्स अशा दिवसभर अनेकांच्या संपर्कात येणा-या कर्मचा-यांची चाचणी करण्याचा महत्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. या सर्व कर्मचा-यांच्या कार्यस्थळापर्यंत मनपाचे फिरते चाचणी केंद्र नेउन सर्वांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येसंदर्भात शनिवारी (ता.१३) मनपा मुख्यालयात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरित्या हा निर्णय घेतला.

‘कोरोना वार रूम’मध्ये झालेल्या विशेष बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, डॉ.नरेंद्र बहिरवार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे, मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ.टिकेश बिसेन, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, विजय हुमने, गणेश राठोड, हरीश राउत, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, साधना पाटील व सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीमध्ये महापौरांनी शहरातील रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणांच्या स्थितीचा आढावा घेतला. शहरात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्या नगर, न्यू बिडिपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर या नउ भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. कोरोना संसर्गाची साखळी वेळीच खंडीत करणे आवश्यक असून कोव्हिड संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुरू असेलेली प्रशासनीय कार्यवाही पुन्हा एकदा सुरू करण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले.

शहरातील कोरोनाबाधित रुग्ण निघत असलेल्या भागातील संबंधित नगरसेवकांना तातडीने माहिती देण्यात यावी. याशिवाय त्या भागात ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’द्वारे बाधिताचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून संपर्कातील २० लोकांची चाचणी करणे. तसेच संबंधित ठिकाणी मनपाचे फिरते कोव्हिड चाचणी केंद्र पाठवून चाचणी करणे. चाचणी केंद्र पाठविण्यापूर्वी त्याबाबत नागरिकांना घंटागाडी, आवाहन करणारे वाहन व इतर माध्यमातून जनजागृती संदेश प्रसारीत करून नागरिकांना सतर्क करणे व चाचणी करण्याचे आवाहन करणे. याशिवाय संबंधित भागात असणा-या सामाजिक संस्था, गणेश मंडळ, शारदोत्सव, दुर्गोत्सव मंडळांचेही सहकार्य घेउन त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. सोबतच प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागातील किराणा दुकान, सलून, लॉंड्री, अन्नधान्याचे दुकान आदींमधील कर्मचा-यांची चाचणी करणे, दृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

…तर मंगलकार्यालये, रहिवासी सदनिका होणार सील
१६ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी मोठ्या संख्येत लग्न समारंभ आहेत. लग्न समारंभामध्ये सर्रासपणे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अशी ठिकाणे कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे यादृष्टीने महत्वाचा निर्णय मनपा आयुक्तांद्वारे घेण्यात आला आहे. शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या मंगलकार्यालय, लॉन आदी ठिकाणी आढळल्यास संबंधित मंगलकार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय एखाद्या निवासी भागामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तेथील निवासी भागातील तसेच सदनीकांमधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. चाचणी करण्यास विरोध झाल्यास अथवा टाळाटाळ करण्यात आल्यास संबंधित सदनीका, रहिवासी क्षेत्र सील करण्याचे सक्त निर्देशही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे. आयुक्तांनी यासंबंधिचे अधिकार सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले आहेत, हे विशेष.

शहरातील खाजगी पॅथॉलॉजी लॅबमधून चाचणी झालेल्यांची माहिती घेउन त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे व धोकादायक वर्गातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याबाबत कार्यवाही तसेच सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांची माहिती घेउन त्यांच्या परिवारातील, संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. शाळा, वसतीगृहांमधून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होउ शकतो त्यामुळे शाळांना मनपाच्या टिमने भेट देउन तेथे दिशानिर्देशांचे पालन होते अथवा नाही याची पाहणी करणे आणि वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

कोरोना रुग्ण जास्त असलेले भाग तसेच गर्दीची ठिकाणे जिथून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे अशा ठिकाणी मनपाच्या टिम द्वारे आकस्मिक पाहणी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ कारवाई व्हावी, अशी सुचना यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी केली. त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

सुरक्षेची काळजी घ्या, मनपाला सहकार्य करा : महापौरांचे आवाहन
शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होताच आपण सर्वांनी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे सुरु केले आहे. मात्र ही गंभीर बाब आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्या त्या प्रारंभिक वेळी आपण सर्वांनी जशी सुरक्षेची काळजी घेतली, नियमांचे पालन केले तसे आजही करण्याची गरज आहे. लग्न समारंभामध्ये जाणा-या नागरिकांनी मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा. मंगलकार्यालयाबाहेरही सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात यावी. सर्व व्यापा-यांनी दुकानात पाच पेक्षा जास्त लोक जमा होउ नये, याची काळजी स्वयं शिस्तीने सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी जनतेला केले आहे.