Published On : Tue, Dec 7th, 2021

विदेशातून येणा-यांची कोरोना चाचणी ‍अनिवार्य मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश

नागपूर : “ओमायक्रॉन” या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा संभाव्य धोका लक्षात सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात विदेशातून येणा-या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशाची “जीनोम सिक्वेन्सिंग” करण्यात यावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीयंटचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणांच्या तयारी संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता.७) विशेष बैठक घेतली. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्यासह सर्व झोनल आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका आहे. दक्षिण आफ्रीका, झिम्बॉबे, बोत्सवाना हे देश ओमायक्रॉनचे हायरिस्क देश ठरले आहेत. अशा स्थितीत या देशांमधून येणा-या प्रवाशांबाबत विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. विमानतळावर अथवा कोणत्याही मार्गाने या तिन्ही देशातून येणा-या प्रवाशांसाठी विशेष स्क्रिनिंग व तपासणी करीता वेगळी व्यवस्था करणे, येणा-या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी दरम्यान एखादा प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्याची “जीनोम सिक्वेन्सिंग” करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाचे सॅम्पल मेडिकल, मेयो अथवा एम्स मध्ये पाठविण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. उपरोक्त तिनही हायरिस्क देशांव्यतिरिक्त अन्य देशातुनही येणा-या प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची सर्व रुग्णालय सज्ज करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा, पीपीई किट, ऑक्सिजन आदी व्यवस्था मुबलक प्रमाणात करून घेण्यात यावी. शहरात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय आपात्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यासोबत सामना करण्यास मनपाची आरोग्य यंत्रणा आधीच सज्ज असावी, अशीही सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनल आरोग्य अधिका-यांना केली.