चंद्रपूर : शहर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा २.०, आझादी का अमृत महोत्सव तसेच स्वच्छ सर्वेक्षण – २०२२ अभियानांअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन आदी विषयांवर आधारित भित्तीचित्रांमार्फत (वॉल पेंटिंग) जनजागृती करण्यात येत आहे. कुंचल्यातून ही भित्तीचित्रे रेखाटली जात असून, ही चित्रे शहरवासियांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांचेही खास आकर्षण ठरली आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत आता भिंतीवर चित्रे रेखाटून जनजागृती करण्याची मोहीम महानगरपालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच सुरू करण्यात आली असून, संरक्षक भिंतीवर स्वच्छतेबाबतची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. यात कोरोना मुक्तीसाठी हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखण्याविषयी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
शहरातील भिंतींवर स्वच्छता, पर्यावरण विषयी जनजागृती केली जात आहे. रेल्वे आणि बसच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील भिंतींसह सार्वजनिक ठिकाणच्या मोक्याच्या भिंती तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या भिंतींवर ही चित्रे रेखाटली जात आहेत.
