Published On : Thu, Mar 26th, 2020

नागपुरात ‘कोरोना’ सर्व्हेक्षणाला सुरुवात

नागपूर: नागपूर शहरातील प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आजपासून (ता. २६) कोरोना सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे.

नागपुरात आढळलेले कोरोना बाधित रुग्ण लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील होते. त्यांच्या घरापासून तीन किमी परिसरातील कुटुंबांचा सर्व्हे नुकताच आटोपला. आता उर्वरित आठही झोनचा सर्व्हे करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर आज २६ मार्चपासून २८८ चमूच्या माध्यमातून सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. आठही झोनमध्ये एकाच वेळी विविध चमूने नागरिकांच्या घरी भेटी देत आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली.

याच सर्व्हेदरम्यान कोणी परदेशातून आले आहेत का, याची माहितीही घेतली जात असल्याचे आरोग्य उपसंचालक तथा आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी सांगितले. या सर्व्हेक्षणामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती मनपाला उपलब्ध होणार असून कोरोनाची काही लक्षणे कोणामध्ये आढळल्यास तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले आहे.