Published On : Sun, Sep 27th, 2020

कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ मोहीम यशस्वी करा : मुख्यमंत्री

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

माझे कुटुंब – माझी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत नागपूर, गोंदिया, भंडारा चंद्रपूर,गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर जिल्ह्यातील या मोहिमेबाबतची सद्यस्थिती सादर केली. तर सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी देखील जिल्ह्यातील माहिती व कोरोना संदर्भातील वस्तुस्थिती व आवश्यकते बाबतची माहिती दिली.

नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या काही दिवसात नागपूर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्या बद्दलची कारणे सांगितली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया येथे कोरोना प्रयोगशाळा सुरू करण्याबाबतची मागणी केली. चंद्रपूर येथे अद्यावत कोरोना रुग्णालय उभारण्यात येत असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर सुनील केदार व विश्वजीत कदम यांनी अनुक्रमे वर्धा आणि भंडारा जिल्ह्याची माहिती दिली.

सर्व जिल्ह्यातील या मोहिमेबद्दलची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना विषयक आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजना करता येईल. मात्र रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लस येईपर्यंत त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कुठून आणणार? प्रत्येक सुविधांसाठी मर्यादा आहेत. त्यामुळे प्रत्येक घराघरात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी, माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम अतिशय सक्रियतेने राबविणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कायदे व दंड करून यातून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन चौकशी करणे, प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, कोरोना विषयक चाचण्यांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणे, डॉक्टरांसोबत चर्चा करून आरोग्यविषयक सुविधा सुधारणे, आदी बाबींवर लक्ष वेधण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपले स्वप्न कोरोना मुक्त महाराष्ट्र आहे. आगामी काळात सर्वाधिक कोरोना बाधितांचा महाराष्ट्र नव्हे तर कोरोना मुक्त महाराष्ट्र, असे चित्र राज्याचे निर्माण झाले पाहिजे. यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी सर्वानी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या थँक्यू आशाताई मोहिमेला राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या प्रयोगाला राज्यव्यापी करण्यात यावे, प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी, सण-उत्सव यासाठी नागरिक बाहेर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास आदीनी देखील सूचना केल्यात.

Advertisement
Advertisement