नागपूर : शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता प्रशासनिक स्तरावर ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित विभागांनी आदेशांचे पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी समन्वय बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.
शनिवारी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस भवन येथे ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर पोलीस, महापालिका, जिलाधिकारी कार्यालय तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी विशेषतः उपस्थित होते.
यावेळी नागपूरमधील सर्व प्राणी कल्याण संस्था, प्राणी संरक्षणाशी संबंधित सामाजिक संघटना, कुत्रा प्रेमी आणि जागरूक नागरिकांनी सहभाग घेत आपल्या सूचना आणि मते मांडली. यामुळे भटक्या कुत्र्यांवर प्रभावी उपाययोजना आखण्यास मदत होणार आहे.
बैठकीत सहभागी झालेल्या पशुप्रेमींनी न्यायालयाच्या आदेशांनुसार काम करण्याची तयारी दर्शवली. त्याचबरोबर शहरातील भटक्या कुत्र्यांवर काम करताना भेडसावणाऱ्या अडचणींवर त्यांनी प्रकाश टाकला आणि या संदर्भात पोलिस प्रशासनाकडून सहकार्याची मागणी केली.