Published On : Mon, Aug 7th, 2017

नरखेड येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा-पालकमंत्री

नागपूर :नरखेड येथे कायदा व सुव्यवस्था राखतांना कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही, यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला केले आहे.

नरखेड येथील नुकत्याच घडलेल्या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येईल. तसेच दोषीविरुध्द कठोर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

नरखेड येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे यावेळी आवाहन केले.

नरखेड येथील प्रकरणासंदर्भात पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळेत हस्तक्षेप करुन कार्यवाही केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणांचा तपास करुन दोषींविरुध्द कार्यवाही केली जाईल. सोशल मिडीयावर येणाऱ्या कुठल्याही संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कायदा हातात घेण्याचा तसेच शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नरखेड येथे भेट देवून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नागरिकांशी चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.