नागपूर : एकीकडे गेल्या काही दिवसांपासून शहरात दरोडा आणि चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.त्यामुळे नागपूरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून नुकतेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून खडेबोल सुनावले होते. मात्र आज थेट शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ पोलीस चौकीतून कुलर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
या प्रकारामुळे शहरातील चोरांना आता पोलिसांचीही भीती वाटत नसल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.
ही घटना सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री घडल्याची माहिती आहे. ड्युटीवर पोलीस असतानाही चोरट्यांनी पोलीस चौकीतील वॉटर कुलर चोरल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी सकाळी ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कुलर गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर ही बाब समोर आली.
या घटनेमुळे नागपूर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. या घटनेमुळे गोकुळपेठ पोलीस चौकीत तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांना त्यांच्या वरिष्ठांनी फटकारल्याची माहिती आहे.
‘नागपूर टुडे’शी बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी चोरीचे खंडन केले असून, कुलर चोरीला गेला नसून तो पोलिसांनीच फेकून दिला असेल असे म्हटले आहे. मात्र पोलिस सूत्रांनी चोरीला बातमीला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे नागपुरातील पोलीस ठाण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.










