- प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या
- नुकसानी संदर्भात 48 तासात पर्यवेक्षक
- 15 दिवसात विमा असलेल्यांना भरपाई
नागपूर: खरीप हंगामात पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत माहिती देण्यासाठी भारतीय कृषी कंपनीतर्फे 1800 103 0061 हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपीकांचे नुकसान झाल्यास तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत टोलफ्री क्रमांकावर तसेच संबंधित बँक, तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यालयात घटनेसंदर्भात दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण, सर्व्हे नंबरसहीत माहिती देणे आवश्यक आहे. या संदर्भात मुल्यांकन निश्चित करण्यासाठी विमा कंपनीला माहिती प्राप्त झाल्यापासून 48 तासाच्या आतत पर्यवेक्षकाची नियुक्ती करावयाची आहे व 15 दिवसाच्या वैयक्तिक विमा भरपाईची रक्कम अदा करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज तसेच सातबारा, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा आदी विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यालयात उपलब्ध असून पीक नुकसानीचा पुरावा म्हणून घेतलेले छायाचित्र सादर करता येतील.
पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणासाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान, पीक पेरणी, तथा लावणीपूर्व नुकसान, काढणीपक्षात नुकसान जसे चक्रीवाढळ, अवकाळी पाऊस, स्थानिक आपत्तीमध्ये पूर, गारपीठ, भूसखलन आदीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी शेतपीकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.