
“पराभव दिसतोय म्हणून अफवा पसरवल्या जातायत”
आमदार मेघेंनी स्पष्ट केलं की, “विरोधकांना आधीच पराभव दिसत असल्याने ते खोटे दावे करून जनतेत गोंधळ निर्माण करत आहेत. हे आरोप काही नवे नाहीत — २०१९ च्या निवडणुकीतही अशीच वक्तव्यं झाली होती आणि ती न्यायालयात फेटाळली गेली होती.”
मेघेंनी पुढे सांगितले की, “ज्यांच्या नावांवर आक्षेप घेतला गेला आहे त्यात दोन बीएलओ (BLO) आणि एक माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. मग हे बनावट मतदार कसे ठरू शकतात?”
एनसीपी नेत्यांचा दावा
माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी राजीवनगर प्रभाग क्रमांक ५ मधील घर क्रमांक १ या पत्त्यावर तब्बल २०० हून अधिक मतदारांची नावे असल्याचा दावा केला आहे. बंग यांच्या मते, ही गोष्ट निवडणूक यादीतील मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहाराचे उदाहरण आहे.
त्यांनी आणखी सांगितले की, “काही झोपडपट्टी भागात सत्ताधारी पक्षाशी संबंधित कुटुंबांच्या २७ सदस्यांची नावे अतिरिक्तरीत्या जोडली गेली असून ही शंका निर्माण करणारी बाब आहे.”
“माझं कुटुंब इथंच राहतं, परक्या देशातून नाही आलं”
आपल्या कुटुंबाच्या नावांवर आक्षेप घेतल्याबद्दल आमदार मेघेंनी रोष व्यक्त केला. “माझे नातेवाईक गेली २०-२५ वर्षं वानाडोंगरीतच वास्तव्यास आहेत. ते पाकिस्तानहून आले नाहीत; मग त्यांची नावे मतदार यादीत असणं चुकीचं कसं?” असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी प्रत्युत्तरादाखल सांगितले की, “बंग आणि घोडमारे कुटुंबातील तब्बल २० सदस्यांची नावेही याच यादीत असून ते त्या भागात राहत नाहीत. मग त्याबाबत विरोधक काही बोलत नाहीत का?”
सध्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे वानाडोंगरीतील राजकीय वातावरण तापलेलं असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नव्या संघर्षाची चाहूल लागली आहे.










