
नागपूर– महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक प्रमुख नेते मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत मतदानात वापरण्यात येणाऱ्या मार्कर शाईच्या वादावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर करण्यात आलेला आहे. कोणाला याबाबत शंका असल्यास त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे दाद घ्यावी. मात्र काही लोकांना उद्याच्या निकालाची कल्पना आलेली असल्यानेच आजपासून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निकालानंतर जबाबदारी कुणावर टाकायची याचीच ही पूर्वतयारी आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, “मतदान हा लोकशाहीचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान हे केवळ अधिकार नसून एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. मतदान न करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अवमान होय.”
तसेच त्यांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटले की, “आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. जनतेतून पाठिंबा मिळत नसल्याने अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याची प्रवृत्ती चुकीची असून ठोकशाहीला लोकशाहीत स्थान नाही.








