Published On : Sat, Mar 13th, 2021

मिशनरी कांशीरामजींचे योगदान आंदोलनकारी कांशीराम : उत्तम शेवडे

नागपुर – 15 मार्च 1934 ला पंजाबात जन्मलेल्या कांशीरामजी ह्यांना वयाच्या 31 वर्षापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख नव्हती. कार्याची ओळख झाल्यावर 14 ऑक्टोंबर 1971 अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्यांक कर्मचारी असोसिएशन पुणे या संस्थेची स्थापना करून मिशनरी कार्याला पुण्यातूनच आरंभ केला.

समस्या या राष्ट्रीय स्तरावरील असल्याने *बामसेफ* या कर्मचारी संघटनेची 6 डिसेंबर 1973 ला घोषणा करून पाच वर्षानंतर 6 डिसेंबर 1978 ला राष्ट्रीय स्तरावरील ब्रेनबँक, मनीबँक अश्या बामसेफ ची विधीवत स्थापना केली. संघटन बांधणी नंतर 6 डिसेंबर 1981 ला डीएस-4 नावाने संघर्षशील संघटनेची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ पूर्ण करण्याच्या हेतूने 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टी (BSP) ची दिल्लीत स्थापना केली.

बसपा ला अवघ्या तेरा वर्षात 1997 ला राष्ट्रीय स्तरावरील मान्यता व हत्ती हे चिन्ह मिळवून दिले. बसपा, भाजपा-काँग्रेस नंतर देशात तिसऱ्या क्रमांकाची राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. याचे श्रेय कांशीरामजी, त्यांच्या सशक्त उत्तराधिकारी बहन कुमारी मायावतीजी यांना व त्यांच्या लाखो मिशनरी कार्यकर्त्यांना जाते.

बाबासाहेबांच्या चळवळीतील नेत्यांपासून धडा घेऊन कांशीरामजींनी आपलाच पैसा, आपलीच बुद्धी, आपलीच शक्ती या आधारे कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून बहुजन मूव्हमेंट ला राष्ट्रीय स्वरूप दिले. व त्यासाठी त्यांनी आंबेडकर वादाचे पुनरपल्लवन होऊ शकते काय?, फिरते आंबेडकरी मेळे, पुणे करार धिक्कार परिषदा, जनसंसद अधिवेशने, सायकल मार्च, ओबीसींची समस्या हीच भारताची प्रमुख समस्या, अन्याय मुक्ती आंदोलन परिषदा, समता व स्वाभिमानाचा संघर्ष, मंडल आयोग समर्थन रैली, स्वतंत्र भारतात बहुजन समाज गुलाम व लाचार का, आरक्षण म्हणणे शासन प्रशासनातील भागीदारी, अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपाय, भाईचारा बनाव अभियान, भारतीय शरणार्थी आंदोलन, सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्ती आंदोलन, बहुजन समाज हितकारी संमेलने, जाती तोडो समाज जोडो आंदोलने, महापुरुषांचे मेळे, किसान मजदूर आंदोलने, सावधान यात्रा, भरोसा यात्रा, संविधान समीक्षा विरोधी जीप मार्च आंदोलन, असली आजादी का संघर्ष, स्वतंत्र भारतात बहुजन समाज आश्रित का?, कही हम भूल न जाये?, पर्दाफाश रैली आदीद्वारे बहुजन समाजात जाणीव जागृती निर्माण केली.

त्यामुळे बहुजन समाजातील विशेषतः अनुसूचित जाती-जमाती व अती मागासवर्गीय (MBC) समाजात सत्तेची अभिरुची निर्माण करून त्यांना संघटित केले. त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. परिणामता वीस-पंचवीस पक्ष मिळून कॉंग्रेस- भाजपा ला केंद्रातील मजबूर सरकार बनवावे लागले.

कांशीरामजी ह्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील मिशनरी व प्रामाणिक कार्यामुळेच आज देशात आंबेडकरी राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कांशीरामजींनी प्रस्थापित पक्षांना मनुवादी पक्ष व मीडियाला मनुवादी मिडीया संबोधून स्वतःचा पक्ष व बहुजन मीडिया उभा केला होता. कांशीरामजींच्या 87 व्या जन्मदिनानिमित्त बहुजन समाजातर्फे त्यांना अभिवादन.