Published On : Mon, Jun 1st, 2020

कोव्हिडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत नियमीत सॅनिटायजींग सुरू

Advertisement

ठेवण्याचे निर्देश : आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा

नागपूर : शहरात कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोव्हिडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमीत सॅनिटायजींग सुरू ठेवा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

विविध विषयाच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह सदस्य संजय बुर्रेवार, सदस्या विशाखा बांते, सरीता कावरे, आशा उईके, लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, प्रभारी निगम सचिव डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, हत्तीरोग व हिवताप अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या परिसरात सॅनिटायजेशन करिता त्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा स्थितीमध्ये सॅनिटायजेशन प्रक्रिया नियमीत सुरू करण्यात यावी. याशिवाय प्रत्येक प्रभागामध्ये सॅनिटायजेशन व्हावे, कोणताही भाग त्यातून सुटू नये यासाठी त्याचे वेळापत्रक तयार करून ते संबंधित नगरसेवकांना देण्यात यावे व त्यानुसारच कार्यवाही केली जावी. सॅनिटायजेशनकरिता स्वयंसेवी संस्थाना ही परवानगी देण्यात यावी, असेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

बैठकीत कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगावर यानंतर पुढे प्रतिबंध व नियंत्रणाबाबत उपाय योजना, शहरातील लहान व मोठे नाले सफाईबाबत दरवर्षी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यावर होणार खर्च व या कामासाठी नवीन मशिनरी खरेदी संदर्भाच्या तक्रारीवर संबंधित विभागप्रमुखांसह बी.व्ही.जी. कंपनीसोबत सविस्तर अहवाल या विषयांवर चर्चा करण्यात आली.

कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई यांनी यावेळी विस्तृत माहिती सादर केली. नागपूर शहरात आतापर्यंत ५०८ रुग्ण असून पुढे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील गरोदर मातांसह हायरिस्क रुग्णांची प्राधान्याने तपासणी केली जाते.

शहरात आजघडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड, शालिनीताई मेघे हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय शहरातील रुग्ण संख्या वाढल्यास खाजगी रुग्णालयांमध्येही उपचार सुरू केले जाणार असल्याचेही डॉ.योगेंद्र सवाई यांनी सांगितले. कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ते दूर व्हावेत यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच खाजगी रुग्णालयांसंदर्भात मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात यावे, असेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

बी.व्‍ही.जी. संदर्भात चौकशी समिती
घराघरांमधून संकलित करण्यात येणा-या कच-यामध्ये माती मिश्रीत करून त्याचे वजन वाढवून मनपाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या आरोप लावले गेले. या संपूर्ण विषयाची सखोल चौकशी व्हावी यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीत चौकशी समिती गठीत करून समितीने येत्या तीन दिवसात आपला अहवाल समितीपुढे सादर करावा, असे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.