| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 6th, 2018

  नागपुरातील मोमीनपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ

  नागपूर : प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.

  परिसरातील मो. तौकीर म्हणाले की, त्यांच्या घरात मोठा भाऊ मो. अतिक व मो. रफीक यांना कावीळ झाला आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मशीद दारुल फलाहजवळ राहणाऱ्या आफरीन कौसर यांना कावीळ झाला आहे. मो. नसीर म्हणाले की, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. घरातील १४ वर्षीय मुलाला कावीळ झाला आहे. अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांनी लोकमत पुढे व्यक्त केल्या. एमआयएमचे रिजवान अन्सारी म्हणाले की, दूषित पाणीपुरवठा ही संपूर्ण प्रभागाची समस्या आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधींची भूमिका मूकदर्शक बनली आहे.

  तकिया दिवानशाह परिसरात गेल्या दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात बऱ्याचदा स्थानिक नगरसेवकांना तक्रारीही केल्या आहेत. नगरसेवकाकडून समस्या सोडविल्या जात नाही, उलट सल्ले दिले जातात की पाणी उकळुन प्यावे. नागरिकांचा आरोप आहे की, नगरसेवक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंतसुद्धा पोहोचवीत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  पाण्यासाठी करावी लागते भटकंती
  मोमिनपुऱ्यातील तकिया दिवानशाह येथे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ पसरल्याने नागरिक चिंतित आहेत. अशात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची सोय दुसऱ्या वस्तीतून करावी लागत आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145