मुंबई: मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्दी घालून भीक मागण्याची परवानगी द्यावी अशी परवानगी मागितली आहे. ज्ञानेश्वर अहिरराव असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना पत्नीचा उपचार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अशक्य झाले आहे. अहिरराव यांनी फडणवीस यांच्याबरोबरच पोलिस आयुक्त दत्ता पडसळगिकर यांनाही पत्र लिहिले आहे.
अहिरराव यांनी पत्रात लिहिले की, मला आजारी पत्नी ज्येष्ठ आई वडील यांची काळजी घ्यावी लागते. सोबतच मला दर महिन्याला कर्जाचा हप्ता भरावा लागतो. पण आता माझा पगार रोखला आहे. त्यामुळे मला या गरजा पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे मी मला वर्दीमध्ये भीक मागण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. या प्रकरणी पोलिस विभागाकडून मात्र अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
लोकल आर्म्स युनिटचे कार्यरत असलेल्या अहिरराव यांनी लिहिले की, त्यांनी 20 ते 22 मार्च दरम्यान सुटी घेतली होती. पत्नीचा पाय तुटल्यामुळे त्यांना सुटी संपल्यानंतरही कामावर परतता आले नाही. पत्नीच्या उपचारासाठी युनिट इंचार्जला आणखी पाच दिवस सुटीची माहिती दिली होती असेही अहिरराव यांनी सांगितले. 28 मार्च रोजी ते नोकरीवर पुन्हा रुजू झाले. पण त्यानंतर त्यांना पगार मिळणेच बंद झाले.