
नागपूर : शहराच्या ऐतिहासिक महाल परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या नवीन ‘श्रीमंत रघुजीराजे भोसले नगर भवन’ (टाऊन हॉल) इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात असून, येत्या डिसेंबर मध्ये टाऊन हॉलचे लोकार्पण होणार आहे. यासंदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बुधवार (ता.२५ ) रोजी पाहणी केली.
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. सचिन नाईक, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, उप अभियंता श्री. राजीव गौतम यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा तसेच प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.
विशेष म्हणजे, दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा मनपाच्या नवीन टाऊन हॉल इमारतीसह सभागृहाची निर्मिती केली जात आहे. अशा प्रकारे तयार होणारा हा देशातील पहिला टाऊन हॉल असणार असल्याची माहिती सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल येथे श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. ६८०८.१३ चौरस मीटर भूखंडामध्ये उभारण्यात आलेले नवीन टाऊन हॉल दोन तळमजले अधिक चार मजले आहेत. यात खालच्या तळमजल्यावर अतिविशेष व्यक्ती, मा. महापौर यांचे वाहनांकरिता प्रवेश आणि पार्कींग, दुसऱ्या तळमजल्यावर मनपा सभागृहाचे मा. सदस्य आणि अधिकारी यांचे प्रवेश, कार्यालय परिसर आणि पार्कींग, पहिल्या मजल्यावर १५५ क्षमतेचे सभागृह आणि दुसऱ्या मजल्यावर २८८ सदस्य आणि ५० अधिकारी यांची आसन व्यवस्था असलेले मुख्य सभागृह, मा. महापौर, मा. आयुक्त, मा. उपमहापौर, मा. विरोधी पक्षनेते यांचे कार्यालय. तिसऱ्या मजल्यावर अभ्यागत, पत्रकार यांच्यासह २१० व्यक्ती आसन क्षमतेची गॅलरी आणि चौथ्या मजल्यावर कार्यालये, कॅन्टीन आणि मोकळे छप्पर आहे.



