Published On : Mon, Apr 12th, 2021

भंडारा शहरातील लाल शाळेत 200 खाटांचे कोविड रुग्णालय तयार

भंडारा :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री शाळेत 200 खाटांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या रुग्णालयाची कांग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले व जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज पाहणी केली. या रुग्णालयात गरजू रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असे श्री. पटोले यांनी सांगितले.

वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता सामान्य रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत. ही लक्षात घेता जिल्हाधिकारी कदम यांनी मनरो शाळेत 200 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात हे रुग्णालय कार्यान्वित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. पडोळे यांचे रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले असून या ठिकाणी 50 खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यासोबतच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तुमसर येथे 50 खाटा, साकोली येथे 30 खाटा, पवनी येथे 40 खाटा, कोविड केअर सेंटर तुमसर येथे 20 खाटा, साकोली येथे 50 खाटा व पवनी येथे 30 खाटाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आमदार नाना पटोले व जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी लाल बहादूर शास्त्री शाळेतील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.