Published On : Fri, Nov 18th, 2022

चिंता करण्याचे कारण नाही:देशाचे संविधान एकदम सुरक्षित, नागभूषण पुरस्कार सोहळ्यात माजी सरन्यायाधीश शरद बोबडेंचे वक्तव्य

Advertisement

देशात सध्या सुरू असलेले राजकारण पाहाता कोणालाही अस्वस्थ व असुरक्षित वाटू शकते. पण, काळजी करण्याचे कारण नाही. देशाचे संविधान एकदम सुरक्षित आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी येथे आज बोलताना दिली.

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, ख्यातनाम विधिज्ज्ञ हरीश साळवे आणि ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे यांचा नागभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. वर्धा राेडवरील हाॅटेल रॅडीसन ब्ल्यू येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्या. विकास सिरपूरकर होते.

संविधान धोक्यात – लिलाताई चितळे

या कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे यांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याची वेदना व्यक्त करीत न्यायमूर्तींनी संविधानाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते. संविधान सुरक्षित राहिले तरच महात्मा गांधींनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती होईल असे त्या म्हणाल्या.

संविधानाला धोका नाही – शरद बोबडे

लिलाताई चितळे यांना आश्वस्त करताना शरद बोबडे यांनी संविधानाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. न्यायालये संविधानाचे संरक्षक आणि पालक म्हणून काम करीत आहे. त्यामुळे संविधान सुरक्षित आहे असे बोबडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही संविधान यापूर्वीही सुरक्षित होते, आताही सुरक्षित आहे आणि यापुढेही सुरक्षित राहिल अशी खात्री दिली. यावेळी बोलताना सिरपूरकर यांनी तीनही सत्कारमूर्तींशी असलेले कौटुंबिक संबंध आणि आठवणींना उजाळा दिला.

लहानपणी हेलिकाॅप्ट​​​रचा हट्ट हरिष साळवे

सत्काराला उत्तर देताना हरिश साळवे यांनी लहानपणी हेलिकाॅप्टर मागण्यासाठी आईसोबत करीत असलेली खेळी पुढे न्यायालयात युक्तिवाद करताना कामी आल्याचे सांगितले. लहानपणी मला हेलिकाॅप्टरचे खेळणे हवे असायचे.

माझी आई डाॅक्टर होती. मी तिच्याकडे रूग्ण असल्याची नेमकी वेळ पाहून हेलिकाॅप्टरचा हट्ट करीत असे. तिच्याकडे रूग्ण असल्यामुळे आई फार विरोध करू शकणार नाही हे मला माहिती होते. आणि तसेच व्हायचे. हे टायमिंग तेव्हापासून माझ्या कामी येते असे साळवे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात निवडणूक प्रचारामुळे उपस्थित राहु शकले नाही. त्यांचा व्हीडीओ संदेश प्रसारित करण्यात आला.