नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांचे संविधान हेच भारताच्या विकासाचं बळ असल्याचे स्पष्ट केलं.
बावनकुळे म्हणाले की, संपूर्ण भारत, महाराष्ट्र आणि जगभरातील जनतेने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. प्रत्येक चौकात आणि घराघरात जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला नमन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी याच संविधानाचा आधार घेत आहेत.
या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरात संविधानाची उद्देशिका पोहोचवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार नागपूर जिल्ह्यात उद्देशिका वाटपाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे,असे त्यांनी सांगितले.
अमित शहा यांच्या दौऱ्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, हा दौरा पूर्णपणे राज्याच्या विकासासाठी होता, यामध्ये राजकीय हेतू नाही, असे बावनकुळे म्हणाले.