Published On : Mon, May 1st, 2017

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीजेचे कनेक्शन – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement
  • महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन
  • विक्रमी वीज निर्मितीमुळे भारनियमन कमी
  • नागपूरची विकासाच्या भरारीकडे वाटचाल
  • पर्यटन, कृषी, शिक्षण, कौशल्य विकासाला गती


नागपूर
: शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शेतीला सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषीपंपाना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. राज्यात शेतीपंप सौर ऊर्जेवर आणून दिवसभर शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळा कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर सशस्त्र पोलीस दलाच्या पथसंचलनाची मानवंदना स्विकारल्यानंतर जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाप्रसंगी ते बोलत होते.

Today’s Rate
Tue14 Oct. 2024
Gold 24 KT 76,000 /-
Gold 22 KT 70,700 /-
Silver / Kg 90,500 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

Advertisement

विकासाच्या विविध क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजाणीमुळे कृषी, उद्योग, पर्यटन, कौशल्य विकास, तसेच पायाभूत सुविधांमध्ये नवीन परिवर्तन घडत आहे. या परिवर्तनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगतांना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी असलेला अनुशेष दूर करण्यात येऊन आता मागेल त्याला कनेक्शन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात प्रथमच 3 हजार 230 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येऊन भारनियमन कमी करण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळावी या दृष्टीने देशात प्रथमच सौरऊर्जेवर कृषीपंप देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासोबतच विदर्भ व मराठवाडयातील शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधान मंत्री सिंचन योजनेमधून 26 हजार कोटी रुपये सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच उन्नत शेती, समृध्द शेतकरी या अभियानामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच शेतीसंदर्भातील सर्व योजना ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विकासाचा दर 12.5 टक्केवरुन 25 टक्केपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर शहर हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत असतानाच येथील नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्धा व्हाव्यात, यासाठी अमृत योजनेसह विविध योजनाअंतर्गत महानगरपालिकेला 296 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शहरासोबतच ग्रामीण परिसराच्या विकासासाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची लवकरच स्थापना करण्यात येत असून शहरासोबतच ग्रामीण भागाचाही नियोजनबध्द विकास करण्यात येईल. मेट्रो, तसेच ताजबाग, दीक्षाभूमी, कोराडी मंदिर देवस्थान, चिचोली, ड्रॅगन पॅलेस आदी स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


नागपूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाला गतीदेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये यापूर्वी केवळ 200 ते 250 कोटी रुपयाचे वार्षिक नियोजन होत होते. परंतु यावर्षी हा निधी 597 कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आला आहे. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने पोलीस दलामध्ये सुरु असलेल्या उपक्रमासोबतच स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान तसेच जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे जनतेला चांगल्या सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महिला पोलीसांची सुरक्षा व्यवस्था
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिनाच्या कस्तुरचंद पार्क येथे आयोजित मुख्य कार्यक्रम सोहळयाला महिला पोलीसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली.

कस्तुरचंद पार्क येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी विविध पथकांचे पथसंचलन पार पडले. त्यामध्ये नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम कदम, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 चे उपनिरीक्षक डी.एन. कथडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 चे उपनिरीक्षक दिलीप तराडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 चे उपनिरीक्षक अनिल धुसरे, नागपूर शहर पोलीस पुरुष गटात उपनिरीक्षक अनिल कांबळे, नागपूर ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक नितीन वाडिया, लोहमार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक राजेश सरोदे, नागपूर शहर महिला पोलीस उपनिरीक्षक नशिपुन शेख, प्रादेशिक परिवहन विभाग शहर व ग्रामीण पथकाचे अनंत भोसले, नागपूर शहर वाहतूक उपनिरीक्षक विशाल रोकडे, होमगार्ड पुरुष वरिष्ठ पलटन नाईक दिपक घाटे, होमगार्ड महिला पलटन नाईक संजिवनी बोदले, श्वान पथक राणी, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर जोशी, अनिल काले, लाईट व्हेईकल आर्मड् सुमो वासुदेव कुलसंगे, ॲन्टी माईन्सचे आशिष कालसर्पे, वज्रचे सुधाकर लोहारकर, वरुणचे घनशाम पटले, अग्नीशमन दलाचे रमेश बर्डे, रुग्णवाहिका डॉ. उज्वला माटे, यांच्या नेतृत्वात पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच यावेळी 15 वर्षाच्या उत्तम कामगिरीबद्दल 35 विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


याशिवाय क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार सचिन घोडे, आचल मेश्राम तर विहिरगाव येथील श्री. आनंद बहुद्देशिय युवा सामाजिक संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या जलयुक्त शिवार उपक्रमात नागपूर विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा, जिल्हयातील स्मार्ट ग्रामपंचायतीमध्ये महालगावच्या सरपंच दिपाली चणेकर, वागदऱ्याच्या कल्पना फुंडकर, खापरीचे दिनेश पडोळकर, दिगलगोंदी ज्योत्सना मरकाम, धानल्याच्या ज्योती सावरकर, उमरेड तालुक्यातील माया गुरनुले, सितापूरच्या जयमाला साखरकर, आणि दहेगावजोशीचे सरपंच रितेश भोयर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या 30 वर्षापासून नागपूर येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे उत्कृष्ट समालोचक सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळीवकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कृषी विभागाची मोबाईल ॲप एसएमएस सेवा सुरु, 1800 419 8800 टोलफ्री क्रमांक
पालकमंत्री चंद्रशेखर यांच्या हस्ते कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व रिलायन्स फाऊंडेशनच्या मोबाईल व मोफत ध्वनीसंदेशाच्या माध्यमातून कृषी, हवामान, शासकीय योजनांची माहिती मोफत देणाऱ्या एसएमएस व ध्वनीसंदेश सेवेची सुरवात करण्यात आली.


नागपूर जिल्हयातील 13 तालुक्यातील 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व रिलायन्स फाऊंडेशच्या वतीने कृषी विषयक, पशुसंवर्धन, हवामान तसेच शासकीय कृषी योजना विषयी माहिती व संदेश सेवा पुरविण्यात येत आहे. सदर सेवेचा सर्व शेतकरी बंधूनी लाभ घ्यावा, तसेच इतर शेतकऱ्यांना सुध्दा या सेवाचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या 1800 419 8800 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद माने,जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, माजी आमदार यादवराव देवगडे, डॉ. राजीव पोतदार, तसेच विविध लोकप्रतिनिधी, माजी स्वातंत्र्य सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिंनी यांची उपस्थिती होती.