Published On : Mon, May 22nd, 2017

जीएसटी मंजूर होणे ही काँग्रेसचीच उपलब्धी!: विखे पाटील

392025-vikhe-patil
मुंबई:
महाराष्ट्र विधानसभेसह देशभरात जीएसटीला मिळालेली मंजुरी ही काँग्रेसचीच उपलब्धी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने जीएसटी विधेयक मांडले तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला टोकाचा विरोध केला.

कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक पारित होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु, आज त्यांच्याच सरकारने जीएसटी विधेयक पारीत करून घेतले. त्यामुळे देशात जीएसटी लागू होणे, ही भाजपची नव्हे तर काँग्रेसचीच उपलब्धी आहे.

जीएसटीसाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली नाही, हे दुःख असल्याचे विखे पाटील पुढे म्हणाले. परंतु, कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांचा लढा सुरूच राहणार आहे. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असून, पुढील काळात आम्ही अधिक आक्रमकपणे ही मागणी लावून धरू. या सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी बाध्य केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.