| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 13th, 2018

  कांग्रेसी नगरसेवक बंटी शेळकेंना “शॉक’

  नागपूर: वीजबिलाची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणारे कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांना सोमवारी एसएनडीएलने कारवाईचा “शॉक’ दिला. विद्युतपुरवठा खंडित केल्याने त्यांच्या घरी रात्री अंधाराचे साम्राज्य होते. शेळके यांच्याकडील आतापर्यंत एकूण तीन मिटरची वीज कापण्यात आली आहे.

  प्राप्त माहितीनुसार महालात राहणारे शेळके यांच्याकडे वेगवेगळे वीज मीटर होते. त्यातील दोन जोडण्या थकबाकीच्या कारणावरूनच खंडित करण्यात आल्या. तिसऱ्या जोडणीवरून वीजपुरवठा सुरू होते. या मीटरची वीजजोडणीही कापण्यासाठी एसएनडीएलचे पथक जानेवारी महिन्यातच त्यांच्याकडे गेले होते. कारवाई सुरू असतानाच शेळके यांचे कार्यकर्ते गोळा झाल्याने पथकाला परतावे लागले होते. यानंतर बंटी शेळके, त्यांचे भाऊ आणि कार्यकर्ते एसएनडीएलच्या छाप्रुनगरातील कार्यालयात पोहोचले. मीटर फॉल्टी असल्याचा दावा शेळके बंधुंनी केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत 2.68 लाखांच्या एकूण थकबाकीपैकी अर्धे म्हणजेच 1.34 लाखांचा भरणा शेळके करतील आणि मीटरच्या तपासणीनंतर तफावतीची रक्कम भरण्याचे ठरले होते. शेळके यांनी तसे लिहूनही दिले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी केवळ 90 हजारांचा भरणा केला. दरम्यान एसएनडीएलने स्वखर्चाने महावितरणच्या लॅबमधून मीटरची तपासणी करून दिली. यात मीटर बरोबर असल्यचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण थकीत रक्कम भरण्यासाठी एसएनडीएलकडून सूचना वेळोवेळी देण्यात आली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. नोटीसीची मुदत संपल्यानंतर सोमवारी कारवाई करीत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेळकेंकडे अनधिकृत वीजजोडणी घेण्यात आल्याचा पूर्वानुभव असल्याने, यावेळी अनधिकृत वीजजोडणी घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीसही बजावण्यात आली असल्याचे कळते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145