Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपा निवडणुकीत काँग्रेस एकट्याने लढणार;विकास ठाकरे यांची घोषणा

अनिल देशमुखांवरही साधला निशाणा
Advertisement

नागपूर : नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी आगामी नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले की, “नागपूर हे काँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले आहे. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत आहोत. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होत आली आहे. तिसऱ्या पक्षांचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही.”

१५१ जागांवर काँग्रेसची भक्कम तयारी-

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यूसीएन न्यूजशी बोलताना ठाकरे म्हणाले, “२०१९ सालापासूनच आम्ही मनपाच्या निवडणुकीची तयारी करत आहोत. काँग्रेसचे कार्यकर्ते सतत जनआंदोलनात, कार्यक्रमांमध्ये सक्रीय आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढलो. त्यामुळे आता महापालिकेसाठी आम्ही संपूर्ण तयारीत आहोत.”

स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, नागपूरच्या जनतेचा झुकाव काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षांकडेच असतो. लढत मुख्यतः या दोघांमध्येच होते. लहानसहान पक्षांचे अस्तित्व असले तरी निर्णायक भूमिका या दोन पक्षांचीच असते.

त्यांनी पुढे सांगितले की, “आमच्याकडे १५०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. एकूण १५१ जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसची तयारी पूर्ण झाली असून, यावेळी काँग्रेस जोरदार लढत देईल, असा मला आत्मविश्वास आहे.”

अनिल देशमुखांच्या वक्तव्यावर टोला-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी नागपूर महापालिकेतील १०० जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना विकास ठाकरे म्हणाले, “मैदान सर्वांसाठी खुले आहे, पण त्यांना १०० नव्हे तर १५१ जागांवर तयारी करावी. एवढेच नाही, तर त्यांना भूतकाळही पाहावा लागेल. पूर्वी एक एनसीपी होती, आता दोन झाल्या आहेत.”

ठाकरे यांनी स्पष्ट केले की, जर आघाडीतील पक्ष योग्य जागांवर माघार घेतात, तर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. पण सध्या तरी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी चालवली असून, पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली आहे. भाजपविरोधात काँग्रेस एकमेव मजबूत पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादीचे दावे हवे तसे असले, तरी भूमीवर कोणाची ताकद आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असा टोला त्यांनी लगावला.

Advertisement
Advertisement