Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसचा ‘वोट बचाव, देश बचाव’चा एल्गार; दिल्लीत लाखोंचा जनसागर उसळणार; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

Advertisement

काँग्रेसचा ‘वोट बचाव, देश बचाव’चा एल्गार; दिल्लीत लाखोंचा जनसागर उसळणार; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर – ‘वोट बचाव, देश बचाव’ या घोषणेसह दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या रॅलीत देशभरातून लाखो लोक सहभागी होतील, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या रॅलीच्या तयारीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. या रॅलीला मिळणाऱ्या संभाव्य प्रतिसादामुळे भाजप व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विरोध करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

दिल्लीतील रामलीला मैदानासह विविध भागांत या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर टीका केली.

भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून सरकारवर हल्लाबोल-
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. कंपनीकडून एक हजार झाडे लावण्याचे सांगितले जात असले, तरी ही झाडे मोठी होण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असे ते म्हणाले. या परिसरातील शेकरू या वन्यप्राण्याचे अधिवासक्षेत्र आणि अनेक नद्यांची उगमस्थाने यांच्यावर वृक्षतोडीचा परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतील, असा इशारा देत वृक्षतोडीविरोधात जनतेसोबत आपणही आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारचा खुलासा हास्यास्पद असल्याची टीका करत, आज लावलेली झाडे मोठी होण्यासाठी सुमारे २० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.

Advertisement

नांदेडमधील शेतकरी मृत्यू प्रकरणी सरकारला घेरणार-
नांदेडमध्ये कर्जमाफी न झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणावर वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन-तीन दिवसांत नांदेडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुलीला सरकारने आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मात्र, वसुलीसाठी येणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना मारहाण करण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले. त्यांच्या या विधानामुळे वसुलीच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

‘मन की बात’साठी विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचा आरोप-
चंद्रपुरातील एका महाविद्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांना दंड आकारण्याची धमकी देऊन उपस्थित राहण्यास भाग पाडल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. विद्यार्थ्यांना कार्यक्रम ऐकण्याची सक्ती केली जात असल्याचे सांगत त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

मतदानाचा अधिकार, पर्यावरण संरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.