मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू वाघमारे म्हणाले की, काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच यातून दिसून येत आहे. याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे. हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे.
मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली तेव्हा ती जागा मागू नये यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आणला गेला. त्यांना शेवटी पक्षातून बाहेर काढण्यात आलं. आज सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टाचा घासाव्या लागत आहेत.
ती जागा आपली असल्याचं रक्त आटवून सांगावे लागत आहे, मात्र ठाकरेसेने तिथे उमेदवार जाहीर करून टाकला आहे. याच्यातून काँग्रेसची राज्यातील परिस्थिती काय आहे, हे दिसत आहे , असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला आहे.